
पुढील वर्षी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याचे सूतोवाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) तीव्र नापसंती दर्शविली आहे. शहा यांचे विधान क्रिकेट समुदायात फूट पाडणारे असल्याचे पीसीबीने म्हटले असून, आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) याप्रकरणी तातडीच्या बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी केली आहे. भारतात पुढील वर्षी नियोजित असलेल्या वन-डे विश्वचषकावर पाकिस्तान बहिष्कार टाकू शकतो, असे पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने दिले आहे. या प्रकरणामुळे मोठा गहजब उडाल्याचे दिसत आहे.
पाकिस्तान आशिया चषक स्पर्धा झाल्यास भारतीय क्रिकेट संघ तेथे खेळायला जाणार की नाही, याबाबत सुरू असलेल्या चर्चेला जय शहा यांनी त्रयस्थ ठिकाणाचे संकेत देत पूर्णविराम दिला होता. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, हे शहा यांचे विधान पाकिस्तानमध्ये खळबळ उडविणारे ठरले. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून पाकिस्तान संघ माघार घेऊ शकतो, अशीही बातमी समोर आली आहे.
भारताशी क्रिकेट संबंध पूर्ववत करण्याची पाकिस्तानची इच्छा असतानाच कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानऐवजी इतरत्र आयोजित केल्यासच भारत बहुदेशीय स्पर्धांमध्ये खेळेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
पीसीबीच्या सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, पीसीबी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेणार आहे. या बहुसांघिक स्पर्धांमध्ये पाकिस्तान हा भारतासोबत खेळला नाही, तर आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरमध्ये झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या विधानावर चर्चा करण्यात आली. पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणारा आशिया चषक बाहेर हलविल्यास पीसीबी मोठे पाऊल उचलणार आहे.
पीसीबीच्या सूत्राने स्पष्ट केले की, बीसीसीआयचे सचिव आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले जय शहा सर्व निर्णय स्वत:हून घेऊ शकत नाहीत.