भाजपमध्ये प्रवेश टाळल्याने गांगुलीची अवहेलना

बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचा शोध काही दिवस अगोदरपासून सुरू होता. रॉजर बिन्नी यांचेच नाव चर्चेत होते
भाजपमध्ये प्रवेश टाळल्याने गांगुलीची अवहेलना

भारतीय जनता पक्षात जाण्याचे टाळल्यानेच सौरव गांगुली यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पुन्हा अध्यक्ष होण्यापासून रोखले जात आहे, असा आरोप तृणमूल काँगेसने केला आहे. दरम्यान, भाजपने मात्र हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे आणि प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या गांगुली यांना पक्षात घेण्याचा भाजपने कधीही प्रयत्न केला नसल्याचा दावा केला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचा शोध काही दिवस अगोदरपासून सुरू होता. रॉजर बिन्नी यांचेच नाव चर्चेत होते. अखेर काही बैठकांनंतर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. गांगुली यांनी २०१९ मध्ये हे पद स्वीकारले होते.

पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करताना माजी भारतीय क्रिकेट कर्णधाराचा अपमान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, भाजपने गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गांगुली पक्षात सामील होणार असल्याच्या वल्गना केल्या होत्या.

खासदार डॉ. शंतनू सेन म्हणाले की, हे राजकीय सूडबुद्धीचे उदाहरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा दुसऱ्यांदा बीसीसीआय सचिव म्हणून काम करू शकतो; परंतु गांगुली अध्यक्ष म्हणून करू शकत नाही, हा दुजाभाव आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in