CSK ची धुरा पुन्हा धोनीच्या खांद्यावर; ऋतुराज गायकवाड हाताच्या दुखापतीमुळे उर्वरित IPL ला मुकणार

आज (दि.११) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्धच्या लढतीपासून धोनी पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेईल.
CSK ची धुरा पुन्हा धोनीच्या खांद्यावर; ऋतुराज गायकवाड हाताच्या दुखापतीमुळे उर्वरित IPL ला मुकणार
आयपीएल
Published on

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला मोठा झटका बसलाय. त्यांचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपऱ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अनुभवी महेंद्रसिंह धोनीकडे चेन्नईचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शुक्रवारी होणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीपासून धोनी पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेईल. प्रशिक्षक जस्टिन फ्लेमिंग यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. CSK ने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारेही याबाबत घोषणा केली.

आयपीएलचा १८वा हंगाम सध्या धडाक्यात सुरू आहे. मात्र या स्पर्धेत चेन्नईला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ५ सामन्यांतील १ विजय आणि ४ पराभवांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत चक्क नवव्या स्थानी आहे. पाचही सामन्यांत चेन्नईने धावांचा पाठलाग केला आहे. मात्र मुंबई वगळता त्यांना अन्य संघांविरुद्ध अपयश आले. धोनीच्या या लढतींमधील फलंदाजीच्या क्रमावर सातत्याने प्रश्न विचारण्यात आले. मध्यंतरी तो निवृत्ती पत्करणार असल्याची अफवाही पसरली होती. मात्र तसे झाले नाही. काही दिवसांपूर्वी पंजाबविरुद्ध धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाच्या विजयासाठी दमदार फलंदाजी केली. मात्र तरीही चेन्नई पराभूत झाली.

ऋतुराजच्या उजव्या कोपऱ्याला दुखापत

त्यातच राजस्थानविरुद्धच्या लढतीत २८ वर्षीय ऋतुराजच्या उजव्या कोपऱ्यावर चेंडू आदळला. त्यानंतरही ऋतुराज दोन लढतींमध्ये खेळला. मात्र पंजाबविरुद्धच्या लढतीनंतर ऋतुराजच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या कोलकाताविरुद्धच्या लढतीसाठी ऋतुराजच्या संघातील स्थानाबाबत साशंका निर्माण झाली. अखेर प्रशिक्षक जस्टिन फ्लेमिंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदमध्ये ऋतुराज उर्वरित हंगामाला मुकणार असल्याचे जाहीर केले. ऋतुराजने या हंगामात ५ सामन्यांत २ अर्धशतकांसह १२२ धावा केल्या होत्या. त्याच्या नसण्याचा चेन्नईला फलंदाजीत नक्कीच फटका बसेल.

“गुवाहाटी येथील राजस्थानविरुद्धच्या लढतीत ऋतुराजला कोपऱ्यावर जोरात चेंडू लागला. मात्र त्यानंतरही तो जिगरीने खेळला. पंजाबविरुद्धच्या लढतीनंतर स्कॅन केल्यावर त्याची दुखापत अधिक गंभीर असल्याचे दिसून आले. त्याला वेदनाही जाणवत आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव यापुढील आयपीएलमध्ये ऋतुराज खेळणार नाही. त्याच्या जागी अनकॅप्ड प्लेयर म्हणजेच धोनी संघाचे नेतृत्व करेल,” असे फ्लेमिंग म्हणाला. ऋतुराजविषयी कळल्यावर धोनी लगेच कर्णधारपद पुन्हा स्वीकारण्यास तयार झाल्याचेही फ्लेमिंगने सांगितले.

ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रे?

ऋतुराजच्या जागी संघात कोणता नवा खेळाडू सहभागी होईल, याचा निर्णय अद्याप आम्ही घेतलेला नाही, असेही फ्लेमिंगने सांगितले. मुंबईकर आयुष म्हात्रेचा पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आयुष म्हात्रेला संधी मिळणार का हे पाहावे लागेल.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्व कौशल्यासह यष्टिरक्षणावर कुणालाही शंका नाही. मात्र संघातील खेळाडूंची निवड आणि फलंदाज म्हणून धोनीची कामगिरी यांसारखे काही मुद्दे चेन्नईसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आता कर्णधारपदी पुन्हा परतल्यावर धोनी व चेन्नईचा संघ कमाल करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईची कामगिरी कशी?

-४३ वर्षीय धोनीने २००८ ते २०२२ या काळात चेन्नईचे नेतृत्व केले. मग २०२२मध्ये रवींद्र जडेजाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र त्याला ते झेपले नाही, परिणामी काही सामन्यांनी पुन्हा धोनीच चेन्नईचा कर्णधार झाला.

-धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ व २०२३ अशा पाच आयपीएल हंगामांचे जेतेपद मिळवले आहे. तसेच अनेकदा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून फक्त धोनीच चेन्नईचे नेतृत्व करत आहे, असे म्हणू शकतो.

-२०२४च्या सुरुवातीला धोनीने पुन्हा कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेत ऋतुराजची निवड केली. गतवर्षी चेन्नईला बाद फेरी गाठता आली नाही. तसेच यंदाही ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा धोनीच संघाला तारणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in