

चेन्नई : पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात आतापर्यंत सलग तीन सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे किमान शनिवारी घरच्या मैदानात चेपॉक स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईचा संघ विजयासह गुणांचेही खाते उघडणार का, हे पाहणे रंजक ठरेल. कर्णधार ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन यांच्या कामगिरीवर मुख्य लक्ष असेल. त्याशिवाय धडाकेबाज डेवाल्ड ब्रेविस या लढतीत परतण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनी पायाच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकल्याने चेन्नईला जबर फटका बसला आहे. सलग तीन पराभवांमुळे चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. धोनीच्या पुनरागमनाबाबत अद्याप संभ्रम असला, तरी आफ्रिकेचा युवा फलंदाज ब्रेविस शनिवारी परतणार असल्याचे समजते. मात्र सॅमसन व ऋतुराज यांचे अपयश चेन्नईला सतावत आहे. दोघांपैकी एकानेही अद्याप ४० पेक्षा अधिक धावा केलेल्या नाहीत. त्यामुळे आयुष म्हात्रे, सर्फराझ खान या मुंबईकर फलंदाजांवर दडपण येत आहे. गोलंदाजीत नूर अहमद अपयशी ठरत असल्याने चेन्नईला आणखी संघर्ष करावा लागत आहे. बंगळुरूविरुद्ध चेन्नईने तब्बल २५० धावा लुटल्या. मॅट हेन्री, खलिल अहमद यांना गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहे.
दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला अवघ्या एका धावेच्या फरकाने पहिला पराभव पत्करावा लागला. त्या पराभवातून सावरत आता हा संघ पुन्हा विजयपथावर परतण्यास आतुर असेल. सलामीवीर के. एल. राहुलला सूर गवसल्याने दिल्लीची चिंता कमी झाली आहे. तसेच पथुम निसांका, समीर रिझवी, डेव्हिड मिलर लयीत आहेत. नितीश राणाला मात्र डच्चू दिला जाऊ शकतो. गोलंदाजीत कुलदीप यादव छाप पाडत असून लुंगी एन्गिडी, टी. नटराजन व मुकेश कुमार यांचे वेगवान त्रिकुट दिल्लीकडे आहे. कागदावर दिल्लीचा संघ वरचढ वाटत आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात मैदानावर कशी कामगिरी करणार, हे पाहणे रंजक ठरेल. या लढतीवर पावसाचे सावट नसल्याने चाहत्यांना दर्जेदार लढत पाहायला मिळू शकते.
उभय संघांत आतापर्यंत ३१ सामने झाले आहेत. त्यांपैकी चेन्नईने १९, तर दिल्लीने १२ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी चेन्नईच्या बाजूने असली, तरी सध्या कागदावर दिल्लीचा संघ वरचढ असल्याने लढतीत नेमका कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असेल.
खेळपट्टीचा अंदाज
चेपॉक स्टेडियमवरील काहीशा संथ खेळपट्टीवर ही लढत होईल. त्यामुळे फिरकीपटूंना सहाय्य लाभेल. तसेच फलंदाजांना संघर्ष करावा लागू शकतो. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल. लढतीवर पावसाचे सावट नसेल. मात्र दव मोठ्या प्रमाणात येऊ शकते.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, खलिल अहमद, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप