CSK vs LSG IPL 2026 : चेन्नईला लखनऊचा धसका! कडाडत्या उन्हात चेपॉक स्टेडियमवर आज दुपारी उभय संघांत निर्णायक द्वंद्व

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या निर्णायक टप्प्यावर आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण बदलत आहे. आता रविवारी दुपारी होणाऱ्या लढतीत चेपॉकच्या कडक उन्हात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येतील.
CSK vs LSG IPL 2026 : चेन्नईला लखनऊचा धसका! कडाडत्या उन्हात चेपॉक स्टेडियमवर आज दुपारी उभय संघांत निर्णायक द्वंद्व
Published on

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या निर्णायक टप्प्यावर आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण बदलत आहे. आता रविवारी दुपारी होणाऱ्या लढतीत चेपॉकच्या कडक उन्हात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने येतील. या लढतीसाठी चेन्नईचे पारडे जड असले, तरी त्यांना लखनऊच्या धक्कातंत्राचा नक्कीच धसका असेल. त्यामुळे ही लढत रंगतदार होऊ शकते.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी टी-२० स्टेडियमवर विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नईचा संघ तूर्तास गुणतालिकेत सहाव्या स्थानी असून त्यांनी १० पैकी ५ विजय व ५ पराभवासह १० गुण कमावले आहेत. चेपॉकवर खेळताना चेन्नईला यंदाच्या हंगामात ५ पैकी ३ सामने जिंकता आले आहेत. गेल्या लढतीत चेन्नईने दिल्लीला सहज धूळ चारली. मात्र चेपॉकवरच दुपारी झालेल्या सामन्यात त्यांनी गुजरातकडून पराभव पत्करला होता. त्यामुळे आता लखनऊविरुद्ध चेन्नईला सुधारणा अपेक्षित आहे. लखनऊचे आव्हान जर-तरवर शाबूत असले, तरी त्यांनी नुकताच बंगळुरूला धक्का दिला होता. त्यामुळे चेन्नईलाही त्यांच्यापासून सावध रहावे लागेल.

संजू सॅमसनच्या कामगिरीवर चेन्नईची फलंदाजी अवलंबून आहे. त्याने ज्या पाच लढतींमध्ये १५ धावांचा पल्ला गाठला, त्यांपैकी चार सामन्यांत चेन्नई जिंकली, तर ज्या लढतींमध्ये संजू एकेरी धावसंख्येत बाद झाला. तेथे चेन्नईच्या पदरी निराशा पडली. ऋतुराज व कार्तिक शर्मा यांनाही लय गवसली आहे. शिवम दुबे व डेवाल्ड ब्रेविसच्या फॉर्मची चेन्नईला चिंता आहे. तसेच उर्विल पटेलकडूनही मोठी खेळी अपेक्षित आहे. गोलंदाजीत नूर अहमद व अकील होसेन यांची फिरकी जोडी चेन्नईची ताकद आहे, तर अंशुल कंबोज व जेमी ओव्हर्टन वेगवान माऱ्याची धुरा वाहत आहेत.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणारा लखनऊ संघ तूर्तास १० सामन्यांतील ३ विजयांच्या सहा गुणांसह गुणतालिकेत तळाशी म्हणजेच १०व्या स्थानी आहे. लखनऊचे स्पर्धेतील आव्हान ९० टक्के संपुष्टात आले आहे. मात्र तरीही उरलेल्या आशेवर ते अन्य संघांना धक्के देऊ शकतात. मिचेल मार्शने गेल्या लढतीत शतक साकारले, तर पंत व निकोलस पूरन यांनाही सूर गवसला. प्रिन्स यादव व मोहम्मद शमी यांची वेगवान जोडी घातक ठरत आहे. दिग्वेश राठी व शाहबाज अहमद या फिरकी जोडीला लखनऊ पुन्हा एकत्रित खेळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

उभय संघांत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यांपैकी लखनऊने ३, तर चेन्नईने २ लढती जिंकल्या आहेत. दोन वर्षांनी चेपॉकवर उभय संघ आमनेसामने येतील. २०२४मध्ये लखनऊने चेन्नईला येथे नमवले होते. यावेळी चेन्नईला पलटवार करण्याची संधी आहे.

खेळपट्टीचा अंदाज

चेपॉकवर दुपारी होणाऱ्या सामन्यात खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागतो. तसेच येथे वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टी दुपारच्या लढतींमध्ये पाहायला मिळते. गुजरातविरुद्ध चेन्नई येथे दुपारच्या लढतीत पराभूत झाली होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाऊ शकते.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, सॅक फोल्क्स, आकाश मढवाल, स्पेन्सर जॉन्सन.

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.

वेळ : दुपारी ३.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, २ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

logo
marathi.freepressjournal.in