IPL 2026 : विजयी सातत्य राखण्यासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये आज द्वंद्व

आयपीएलमध्ये शनिवारी रात्री होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद विजयी सातत्य कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर ही लढत होईल.
IPL 2026 : विजयी सातत्य राखण्यासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये आज द्वंद्व
IPL 2026 : विजयी सातत्य राखण्यासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये आज द्वंद्वX
Published on

हैदराबाद : आयपीएलमध्ये शनिवारी रात्री होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद विजयी सातत्य कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर ही लढत होईल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने ५ पैकी २ लढती जिंकल्या आहेत. सुरुवातीचे तीन सामने गमावल्यावर चेन्नईने दिल्ली व कोलकाता यांना नमवून लय मिळवली. मात्र हे दोन्ही विजय घरच्या मैदानातील होते. आता प्रतिस्पर्ध्याच्या मैदानातही वर्चस्व गाजवण्याचे त्यांचे ध्येय असेल. महेंद्रसिंह धोनी या लढतीसही मुकण्याची शक्यता आहे. आयुष म्हात्रे व सर्फराझ खान या मुंबईकर फलंदाजांवर चेन्नईची भिस्त असून संजू सॅमसनलाही सूर गवसला आहे. मात्र ऋतुराजकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. गोलंदाजीत नूर अहमद लयीत आहे. खलिल अहमद दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने चेन्नईला फटका बसू शकतो.

दुसरीकडे इशान किशनच्या नेतृत्वात हैदराबादने पाचपैकी २ सामने जिंकले आहेत. गेल्या लढतीत त्यांनी राजस्थानवर वेगवान गोलंदाजांच्या बळावर मात केली. मराठमोळा प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसैन यांची जोडी व ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन असे धडाकेबाज फलंदाज यांमुळे हैदराबादला कमी लेखणे चेन्नईला महागात पडू शकते. पॅट कमिन्स या लढतीस मुकणार आहे. त्यामुळे फिरकीपटूंकडून हैदराबादला अपेक्षा आहे.

चेन्नई-हैदराबाद यांच्यातील २२ लढतींमध्ये चेन्नईने १५, तर हैदराबादने फक्त ७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारी चेन्नईच्या बाजूने असून त्यांचेच पारडे जड मानले जात आहे.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, खलिल अहमद, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स.

सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, शिवम मावी, ब्रेडन कार्स, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, डेव्हिड पायने, अमित कुमार, प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी.

logo
marathi.freepressjournal.in