‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा पलटवार; हिकारू नाकामुराने केलेल्या अपमानाचा पटलावरच घेतला बदला

‘क्लच चेस : चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी. गुकेशने शांत पण कुशाग्र खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.
‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा पलटवार; हिकारू नाकामुराने केलेल्या अपमानाचा पटलावरच घेतला बदला
Published on

‘क्लच चेस : चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी. गुकेशने शांत पण कुशाग्र खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने केवळ फेरीच जिंकली नाही, तर काही आठवड्यांपूर्वी हिकारू नाकामुराने केलेल्या वादग्रस्त कृतीला पटावरूनच आपल्या कुशाग्र खेळीने सडेतोड उत्तर दिले.

पहिल्या फेरीत गुकेशला मॅग्नस कार्लसनकडून १.५-०.५ असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण, त्यानंतर त्याने जणू आत्मविश्वासाचा प्यादा पुढे सरकवत प्रतिस्पर्ध्यांना दाखवून दिलं “उत्तर शब्दांनी नाही, कृतीनेच दिलं जातं.” दुसऱ्या फेरीत त्याने नाकामुराला १.५-०.५ तर तिसऱ्या फेरीत फॅबियानो कारुआनाला २-० ने पराभूत करत दमदार पुनरागमन केलं. दिवसअखेर गुकेश ४/६ गुणांसह आघाडीवर असून, त्याच्या मागोमाग कार्लसन (३.५), नाकामुरा (३) आणि कारुआना (१.५) अशी गुणतालिका आहे.

नो रिॲक्शन, ऑन्ली ॲक्शन

या स्पर्धेचा सर्वाधिक चर्चेचा क्षण म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच्या प्रदर्शनीय सामन्यात नाकामुराने गुकेशचा पराभव केल्यानंतर रागाच्या भरात त्याचा राजा प्रेक्षकांमध्ये फेकला होता. त्या घटनेवरून मोठा वाद उसळला होता, परंतु गुकेशने त्या वेळी एकही शब्द न उच्चारता संयम राखला होता. आता त्याच प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत गुकेशने जणू संदेश दिला “बोलणाऱ्यांनी नाही, खेळणाऱ्यांनी इतिहास घडवायचा असतो.”

नाकामुराने या घटनेबद्दल नंतर सफाई देताना म्हटले की, “तो अपमान नव्हता, ती फक्त मजा होती.” पण या वेळी गुकेशचा “नो रिॲक्शन, ऑन्ली ॲक्शन” अवतार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

क्लच चेस स्पर्धा

दरम्यान, ही स्पर्धा अमेरिकेतील मिसूरी राज्यातील सेंट लुईस चेस क्लब येथे २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान रंगत आहे. तीन डबल राउंड-रॉबिन फेऱ्यांमध्ये एकूण १८ सामने खेळवले जाणार आहेत. दुसऱ्या दिवसाच्या सामन्यांना दुप्पट गुण आणि बक्षीस मिळणार असल्याने पुढील फेऱ्या अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हं आहेत.

विजेत्यांना कोटींची बक्षिसे

स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम तब्बल $४१२,००० (सुमारे ३.६३ कोटी) इतकी आहे. अव्वल चार विजेत्यांना अनुक्रमे $१२०,००० (१.०६ कोटी), $९०,००० (७९ लाख), $७०,००० (६२ लाख) आणि $६०,००० (५३ लाख) इतके बक्षीस मिळेल. याशिवाय प्रत्येक फेरीच्या विजेत्याला विशेष बोनस देखील दिला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in