
नवी दिल्ली : मानसिकदृष्ट्या तयार नसतानाही रोहित शर्माकडे २०२२मध्ये भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले, असा गौप्यस्फोट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर केला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यामुळे तूर्तास त्याच्या नेतृत्वशैलीबाबत सगळीकडे चर्चा रंगत आहे.
२०२२मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. त्यावेळी आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने पहिली कसोटी जिंकूनही पुढील दोन लढती गमावल्याने त्यांना मालिकेवरही १-२ असे पाणी सोडावे लागले. या मालिकेनंतर लगेचच कोहलीने कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी रोहित भारताच्या एकदिवसीय तसेच टी-२० संघाचा कर्णधार होता.
“कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित हे पद स्वीकारण्याबाबत साशंक होता. त्याचे शरीर त्याला तिन्ही प्रकारांत भारताचे नेतृत्व करण्यासाठी साथ देईल की नाही, याची खात्री नसल्याने त्यावेळी रोहितने कसोटी संघाच्या कर्णधारपदाविषयी फार विचार केला. तो मानसिकदृष्ट्या त्यावेळी तयार नव्हता. मात्र तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रोहितची मनधरणी केली,” असे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
“रोहितची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार असल्याच्या बातम्या फक्त अफवा आहेत. फक्त जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आता २०२५मध्ये होईल. तोपर्यंत रोहित ३८ वर्षांचा असेल. अशा स्थितीत तो भविष्याच्या दृष्टीने किमान कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो,” असेही त्या पदाधिकाऱ्याने नमूद केले.
३६ वर्षीय रोहितची कसोटी कर्णधारपदी निवड झाल्यापासून भारताने १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन लढतींना रोहित मुकला आहे. रोहितने फलंदाज म्हणून या कसोटींमध्ये ३९० धावा केल्या असून, यामध्ये अवघ्या एका शतकाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही.
दुसरीकडे कोहलीने ६८ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी भारताने ४० सामने जिंकले, तर ११ लढती अनिर्णित राखल्या. कोहलीने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताने सुमार कामगिरी केल्यावर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. मात्र त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही हिसकावून घेण्यात आले. अखेर जानेवारी २०२२मध्ये कोहलीने कसोटी नेतृत्वपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रोहितकडे तिन्ही प्रकारांत भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.
विंडीज दौऱ्यानंतर रहाणे, अश्विनचा पर्याय
जुलै महिन्यातील विंडीज दौऱ्यात रोहितच भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर थेट डिसेंबरमध्ये भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. तोपर्यंत रोहित कर्णधारपदावरून पायउतार झाल्यास मुंबईकर अजिंक्य रहाणे किंवा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडे कसोटी संघाचे नेतृत्वपद सोपवता येऊ शकते.