
नागपूरच्या १९ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने धमाकेदार विजय मिळवला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने भारताच्या दिग्गज ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत, भारतासाठी एक नवा इतिहास घडवला. यानंतर दिव्या देशमुख भारताची पहिली महिला विश्वविजेती ठरली आहे.
याआधी, २०२४ मध्ये तिने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. आता एका वर्षातच तिने वरिष्ठ गटात सर्वोच्च शिखर गाठून भारताला आणखी एक महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला आहे. दिव्याचा हा विजय केवळ बुद्धीबळ क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पाच नव्हे तर तिचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य देखील सिद्ध करतो.
टायब्रेकरमध्ये निर्णायक विजय
दिव्याच्या विजयात टायब्रेकरचा महत्त्वपूर्ण रोल होता. अंतिम सामन्यात दिव्याने कोनेरू हम्पीला सुरुवातीच्या दोन्ही गेम्समध्ये ड्रॉ खेळण्यास भाग पाडलं, त्यामुळे सामना टायब्रेकरपर्यंत गेला. दोन टायब्रेकर गेम्समध्ये १५-१५ मिनिटांचा खेळ आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंदांची वाढ असताना, दिव्याने दुसऱ्या टायब्रेकरमध्ये काळ्या मोहऱ्यांवर विजय मिळवला आणि विश्वचषक जिंकला.
भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर
या विजयासह दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. यापूर्वी, कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि तानिया सचदेव या भारतीय महिलांनी ग्रँडमास्टरचा किताब मिळवला आहे.
विजयानंतर भावनिक क्षण
स्पर्धा जिंकताना दिव्या अत्यंत भावूक झाली. हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण होता. कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी ती आधीच पात्र ठरली होती आणि आता तिने आपल्या नावावर विश्वविजेतेपदही मिळवलं.