चेन्नईसाठी करो या मरो; प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय आवश्यक

गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ससाठी प्ले-ऑफ फेरीतील प्रवेशाचा मार्ग खडतर बनला आहे.
चेन्नईसाठी करो या मरो; प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय आवश्यक

चेन्नई : गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ससाठी प्ले-ऑफ फेरीतील प्रवेशाचा मार्ग खडतर बनला आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवून प्ले-ऑफ फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी चेन्नईसमोर ‘करो या मरो’ अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामु‌ळेच रविवारी रात्री बलाढ्य राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात चेन्नईला विजय आवश्यक आहे.

चेन्नई सुपर किंग्स सध्या १२ सामन्यांत १२ गुणांसह चौथ्या स्थानी असला तरी गुजरातविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवण्याच्या आशा डळमळीत झाल्या आहेत. त्यामुळे आता शेवटच्या दोन्ही सामन्यांत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा संघ व्यवस्थापनाला आहे.

गुजरातविरुद्ध चेन्नईचे सलामीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले होते. अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड हे गेल्या काही सामन्यांत चेन्नईला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. डॅरेल मिचेल आणि मोईन अली यांच्या बॅटमधून धावा निघत असल्या तरी स्फोटक फलंदाज शिवम दुबे अखेरच्या टप्प्यात काहीसा मंदावला आहे. शिवम दुबेने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पण आता त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.

मुंबईकर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे चेन्नईसाठी चांगली कामगिरी करत आहे. गुजरातविरुद्ध दोन बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज ठरला. गुजरातच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतके झळकावली तरी शार्दूल ठाकूरने ४ षटकांत दिलेल्या अवघ्या २५ धावा, ही त्याच्या सर्वोत्तम गोलंदाजीची पोचपावती म्हणावी लागेल. आता घरच्या मैदानावर चेन्नईचे गोलंदाज राजस्थान रॉयल्सविरुद्धही दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स ११ सामन्यांत १६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा प्ले-ऑफ फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित असला तरी विजयी पुनरागमन करण्यासाठी ते उत्सुक आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यांत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे आता विजयीपथावर परतण्यासाठी त्यांच्याकडे ही नामी संधी असेल.

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला यंदाच्या मोसमात सर्वोत्तम कामगिरी करता आली नसली तरी आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी तो धडपडत आहे. कर्णधार संजू सॅमसनने यंदाचा आयपीएलचा मोसम गाजवला असून तो चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. त्याचबरोबर रियान पराग, शुभम दुबे आणि रोवमन पॉवेल हेसुद्धा संघाच्या विजयात उपयुक्त योगदान देत आहेत. अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने दिल्लीविरुद्ध तीन बळी मिळवले. आता त्याच्या चेन्नईच्या फेव्हरिट मैदानावर तो आपले नाणे किती खणखणीत आहे, हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आवेश खान दिल्लीविरुद्ध फारसा प्रभावी ठरला नसला तरी त्याला चेन्नईविरुद्ध आणखी एक संधी मिळणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महीष थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अरावेल्ली अविनाश, रिचर्ड ग्लीसन.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिम्रॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोल्हर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, तनुष कोटियन, केशव महाराज.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in