स्टोक्स आणि बॅझबॉल पर्वाचा पराभवाने अस्त; न्यूझीलंडचे इंग्लंडसह कसोटी मालिकेवर २-१ असे वर्चस्व

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. याबरोबरच एकप्रकारे बॅझबॉल पर्वाचाही अस्त झाला. न्यूझीलंडने नॉटिंघम येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १६० धावांनी पराभव करत कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
स्टोक्स आणि बॅझबॉल पर्वाचा पराभवाने अस्त; न्यूझीलंडचे इंग्लंडसह कसोटी मालिकेवर २-१ असे वर्चस्व
स्टोक्स आणि बॅझबॉल पर्वाचा पराभवाने अस्त; न्यूझीलंडचे इंग्लंडसह कसोटी मालिकेवर २-१ असे वर्चस्व
Published on

नॉटिंगहॅम : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. याबरोबरच एकप्रकारे बॅझबॉल पर्वाचाही अस्त झाला. न्यूझीलंडने नॉटिंघम येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १६० धावांनी पराभव करत कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने ४ बाद १०३ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. विजयासाठी ३७३ धावांचे कठीण आव्हान असलेल्या इंग्लंडचा डाव दुपारच्या सत्रात २१२ धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरेल मिचेल याने दुसऱ्या डावात नाबाद १०० धावांची खेळी करत इंग्लंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने पहिल्या डावात शतक झळकावले होते. त्याने या विजयाला अत्यंत विशेष म्हटले आहे. न्यूझीलंडने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी न्यूझीलंडने १९८६, १९९९ आणि २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या कसोटीनंतर कर्णधारपद सोडण्याची आणि १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेण्याची घोषणा रविवारीच केली होती. रविवारीच सलामीला येत स्टोक्स ३० धावांवर बाद झाला होता. “मालिका विजयासह निरोप घेता आला असता तर आनंद झाला असता, पण हे जग परिपूर्ण नाही,” अशी भावना स्टोक्स याने व्यक्त केली. गेल्या नऊ कसोटी सामन्यांपैकी सात सामन्यांत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला असून, यामुळे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि संचालक रॉब की यांच्या नेतृत्वावर दबाव वाढला आहे. मात्र, आपण आपल्या पदावर कायम राहणार असल्याचे मॅक्युलमने स्पष्ट केले.

पाचव्या दिवशी इंग्लंडच्या आशा जो रूट आणि एमिलिओ गे यांच्यावर अवलंबून होत्या. मैदानातील सीमारेषेवरील फलकांवर ‘थँक्यू बेन स्टोक्स’ असा संदेश झळकत असतानाच चौथ्या ओव्हरमध्ये हे दोन्ही फलंदाज बाद झाले. गे १० धावांवर, तर रूट १८ धावांवर बाद झाला. जेमी स्मिथ व ॲटकिन्सन यांच्यात सातव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी झाली. ॲटकिन्सनला १९ धावांवर मिचेल सँटनरने पायचीत केले. दुसऱ्या सत्रात स्मिथ ६० धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव संपला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in