
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या शरीरयष्टीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. माजी क्रिकेटपटू, बीसीसीआय पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शमा यांच्यावर टीका केली आहे.
रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहे. मात्र त्याचवेळी शमा यांनी केलेल्या विधानामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. रोहित शर्माचे वजन फारच वाढलेले आहे. क्रीडापटूला हे शोभेसे नाही. तसेच सुदैवाने तो भारतीय संघाचा कर्णधार झाला, असे विधान शमा यांनी केले. भारताला लाभलेल्या आजवरच्या कर्णधारांपैकी सर्वाधिक अनाकर्षक म्हणून रोहित आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावरून आता बीसीसीआयचे सचिव देवजित साइकिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “एखादी आयसीसी स्पर्धा सुरू असताना एखाद्या पक्षाची व्यक्ती असे मत व्यक्त करणे फारच चिंताजनक आहे. त्यामुळे आपण देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहोत का, असे वाटते. बीसीसीआय या कृत्याचा निषेध करते. रोहित शर्मा हा भारताला लाभलेल्या महान खेळाडूंपैकी एक आहे,” असे साइकिया म्हणाले.
भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांनीही त्यांचे मत मांडले. “प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र खेळाडूच्या शरीराविषयी काय बोलावे, याचा किमान विचार करावा. रोहित जर क्रिकेट खेळण्यासाठी तंदुरुस्त नसता, तर तो भारतीय संघाचा कर्णधार कसा झाला असता. तसेच सध्या चर्चेत येण्यासाठी रोहित व विराट कोहलीच्या नावाचा वापर केला जातो,” असे दिलीप म्हणाले.
“बहुतांश क्रिकेटपटू हे व्यायामशाळेत जातात, सिक्सपॅक बनवतात. मात्र यामुळे ते फिट व अन्य खेळाडू अनफिट असे होत नाही. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते. रोहितने फलंदाज व कर्णधार म्हणून संघासाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्यामुळे शमा यांनी रोहितची माफी मागणे गरजेचे आहे,” असे मत माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी नोंदवले.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरत काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच यामुळे राहुल गांधींवरही त्यांनी निशाणा साधला आहे. शमा यांनी ते ट्वीट डिलीट केले असले, तरी समाजमाध्यमांवर सगळीकडे याविषयी चर्चा रंगली आहे.
भारतातील काही वर्ग मात्र शमा यांच्या मताचे समर्थन करत आहे. शमा यांनी काहीही चुकीचे म्हटलेले नाही. रोहितच्या शरीरयष्टीमुळे युवा पिढीसमोर चुकीचा आदर्श आपण घालत आहोत. भारताचा कर्णधार असा नसावा, अशा आशयाची मते काहींनी नोंदवली आहेत. तर रोहितच्या पाठिराख्यांनी मात्र त्यांना जशात तसे प्रत्युत्तर दिले आहे. रोहितने भारतासाठी आयसीसी स्पर्धा जिंकवून दाखवली आहे. तसेच विश्वचषकात तो सातत्याने चमकदार कामगिरी करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या सर्व बाबींमुळे सध्या रोहित चर्चेत आला आहे.