आयपीएल २०२३ मध्ये फिक्सिंग? मोहम्मद सिराजशी सट्टेबाजाने साधला संपर्क

भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाला सिराजने दिली माहिती, बीसीसीआयकडे केली तक्रार
आयपीएल २०२३ मध्ये फिक्सिंग? मोहम्मद सिराजशी सट्टेबाजाने साधला संपर्क
Published on

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२३ मध्ये फिक्सिंगची बाब समोर आली आहे. एका ड्रायव्हरने फोनद्वारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाजमोहम्मद सिराजशी फोनवरून संपर्क साधून त्याच्याकडून संघाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला (भ्रष्टाचार प्रतिबंधक पथक) दिली आहे. याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे की, ‘एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अंतर्गत माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला दिली.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गेल्या सामन्यात सट्टेबाजीदरम्यान बरेच पैसे गमावल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीला (ड्रायव्हर) सिराजकडून संघातील माहिती हवी होती. त्या व्यक्तीने सिराजला फोन केला. मात्र यानंतर सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही माहिती दिली. मात्र तो बुकी नव्हता. तो हैदराबादचा ड्रायव्हर होता. त्याला आयपीएल सामन्यांदरम्यान सट्टा लावण्याची सवय आहे. सट्टेबाजीत त्याने बरेच पैसे गमावले आहेत. त्यामुळेच त्यांनी सिराजशी संपर्क साधून संघाच्या आतील माहिती जाणून घेण्यासाठी फोन केला होता.

फोन करणाऱ्याची चौकशी सुरू

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या घटनेची माहिती दिली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.

फिक्सिंगचा इतिहास

आयपीएलमध्ये फिक्सिंगचे सावट पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगची प्रकरणे घडल्याचा इतिहास आहे. या अगोदर फिक्सिंग झाली, तेव्हा एस श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जच्या गुरूनाथ मयप्पनवरही स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता.

कडक आचारसंहिता

बीसीसीआयने भ्रष्टाचाराबाबत कडक आचारसंहिता बनवली आहे. कोणत्याही खेळाडूने किंवा अधिकाऱ्याने बुकीशी संपर्क साधल्याची माहिती बीसीसीआयला दिली नाही, तर बोर्ड त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते.

logo
marathi.freepressjournal.in