नवी दिल्ली : बीसीसीआयने फेब्रुवारीत टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच भारताचे नेतृत्व करेल, हे जाहीर केले. कदाचित दोन महिन्यांपूर्वीच बीसीसीआयने हे जाहीर केले असते, तर मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने हार्दिकला संघात घेऊन त्याला कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला नसता, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी व्यक्त केली आहे.
एकदिवसीय विश्वचषकानंतर डिसेंबरमध्ये हार्दिक गुजरातला सोडून मुंबईच्या संघात दाखल झाला. मग काही आठवड्यांत त्याची कर्णधारपदासाठी निवड करण्यात आली. “रोहित आंतरराष्ट्रीय टी-२० खेळत नसल्याने हार्दिक गेल्या एक-दीड वर्षांपासून टी-२०मध्ये भारताचे कर्णधारपद भूषवत होता. त्यामुळे तोच टी-२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व करेल, असे मुंबईच्या व्यवस्थापनासह अनेक चाहत्यांनाही वाटले. यामुळेच हार्दिकला मुंबईच्या संघात परत आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र बीसीसीआयने फेब्रुवारीत रोहितच भारताचे टी-२० विश्वचषकात असे जाहीर केले. हा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच आला असता, तर आज कदाचित रोहितच मुंबईचा कर्णधार असता,” असे सिद्धू म्हणाले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप तीन सामने गमावले असून त्याला चाहत्यांकडून टीकेलासुद्धा सामोरे जावे लागत आहे.