"विश्वचषकासाठी चार फिरकीपटू गरजेचे; रिंकूला वगळणे सर्वाधिक आव्हानात्मक होते"

मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यलयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी रोहितसह निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित होते.
"विश्वचषकासाठी चार फिरकीपटू गरजेचे; रिंकूला वगळणे सर्वाधिक आव्हानात्मक होते"

मुंबई : वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी चार फिरकीपटूंची निवड करणे गरजेचे होते. तसेच हार्दिक पंड्या व शिवम दुबे हे दोनच मध्यमगती गोलंदाजी करणारे अष्टपैलू पर्याय सध्या भारताकडे उपलब्ध आहेत. अशा स्थितीत संघातील ताळमेळ साधण्याच्या हेतूने रिंकू सिंगला वगळण्याचा आव्हानात्मक निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्टीकरण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने गुरुवारी दिले.

मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यलयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी रोहितसह निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित होते. २ जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार असून या स्पर्धेसाठी ३० एप्रिल रोजी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. मात्र या संघात युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल अशा चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच हार्दिक व शिवम यांची निवड झाल्याने रिंकूला संघातील स्थान गमवावे लागले, असेही अनेक जण म्हणाले. यांसारख्या विविध मुद्यांवर गुरुवारी रोहित व अजित यांनी स्पष्टीकरण दिले.

विश्वचषकासाठी चार फिरकीपटू का?

रोहित : विश्वचषकासाठी चार फिरकीपटू निवडण्याचा विचार माझाच होता. वेस्ट इंडिजमधील खेळपट्टीवर फिरकीपटू मोलाची भूमिका बजावतील. तेथील खेळपट्टी संथ असते तसे भारताचे सामने सकाळच्या वेळेस होणार असल्याने फिरकीपटू निर्णायक ठरतील. तसेच संघातील चारपैकी दोन फिरकीपटू हे फलंदाजीतही उल्लेखनीय योगदान देऊ शकतात.

रिंकूला संघातून का वगळले?

आगरकर : रिंकू राखीव खेळाडूंमध्ये नक्कीच आहे. मात्र विश्वचषकासाठी तुम्हाला १५ खेळाडूच निवडता येतात. हार्दिक, शिवम व रिंकू या तिघांपैकी दोघांचीच निवड होणे शक्य होते. हार्दिक सध्या चाचपडत असला तरी सध्या तो भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू आहे. शिवमने आयपीएलमध्ये आताशी एकाच सामन्यात गोलंदाजी केली. त्यामुळे हार्दिककडे दुर्लक्ष करणे अशक्य होते. रिंकूने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र संघरचेनचा विचार करता त्याला १५ खेळाडूंत स्थान मिळू शकले नाही.

संघ निवडीसाठी आयपीएलला प्राधान्य का?

आगरकर : आम्ही आयपीएल सुरू होण्यापूर्वीच जवळपास १२-१३ खेळाडू पक्के केले होते. या स्पर्धेद्वारे प्रामुख्याने यष्टिरक्षक कोण असावा तसेच आमचे फिरकीपटू कोण असतील, एवढेच आम्हाला ठरवायचे होते. शिवमने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका तसेच गेल्या वर्षभरात सातत्याने योगदान दिले आहे. तसेच पंतने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. त्यामुळे ते भारतीय संघातील स्थानाचे हकदार आहेत.

गोलंदाजीच्या विभागाविषयी काय सांगाल?

रोहित : बुमरा, सिराज व अर्शदीप यांचे वेगवान त्रिकुट नक्कीच चांगली कामगिरी करतील. मात्र गरज पडल्यास हार्दिक व दुबे यांच्याकडूनही आम्ही ३-४ षटके गोलंदाजी करवून घेऊ. ते दोघेही या आव्हानासाठी तयार असतील, याची मला खात्री आहे. अमेरिकेतील खेळपट्टीवर कदाचित ३ वेगवान गोलंदाजही खेळताना पाहायला मिळू शकते.

विविध खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळणे हा कारकीर्दीचा भाग

रोहित : सध्या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळत आहे. मात्र आयपीएल संपल्यावर एका आठवड्यातच हार्दिक रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताकडून खेळेल. याविषयी रोहितला विचारले असता तो म्हणाला, “आयुष्यात सगळे काही तुम्ही विचार कराल, असे होणार नाही. विविध खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळून तुम्ही शिकत जाता. आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत. देशाचे प्रतिनिधित्व करून विश्वचषक जिंकणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य असते. त्यामुळे याविषयी फारसा विचार न केलेला बरा.”

logo
marathi.freepressjournal.in