नवी दिल्ली : आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध नसल्याने फ्रँचायझींची चिंता वाढू लागली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सर्व प्रमुख खेळाडूंना मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घडामोडी पाहता, बीसीसीआयने इंग्लंड बोर्डाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकपआधी म्हणजेच २२ ते ३० मे या कालावधीत टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी जोस बटलर याच्यासहित सर्व प्रमुख खेळाडूंना इंग्लंडला रवाना व्हावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू प्ले-ऑफ लढतींसाठी उपलब्ध होतील की नाही, याबाबत फ्रँचायझींमध्ये संभ्रम आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत असून इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये शेवटपर्यंत खेळतील, अशी आशा बीसीसीआयला आहे.
“आपापल्या प्रमुख खेळाडूवर अनेक संघांची मदार असल्यामुळे त्यांनी संपूर्ण मोसमाचे वेळापत्रक किंवा रणनीती आखली आहे. त्यामुळे समजा एखादा खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांमध्ये नसला तर त्यांची अडचण होऊ शकते. काही क्रिकेट बोर्डांनी आता शेवटच्या टप्प्यात आपापल्या खेळाडूंना मायदेशी बोलावले आहे. त्यामुळे आम्ही आता इंग्लंड बोर्डाशी चर्चा करून त्यांच्या खेळाडूंना काही काळ भारतातच थांबण्याची विनंती करणार आहोत. त्यामुळे काही खेळाडू प्ले-ऑफ लढतींसाठी थांबतील, अशी अपेक्षा आहे,” असे बीसीसीआय एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
फ्रँचायझींचे गणित बिघडणार
इंग्लंडने खेळाडूंना मायदेशी परतण्याचे आदेश दिल्यामुळे अनेक फ्रँचायझींनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व खेळाडू आयपीएलच्या अखेरपर्यंत उपलब्ध असतील, असे आश्वासन इंग्लंड बोर्डाने दिले होते. मात्र आता पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांनी काही खेळाडूंना माघारी बोलावले आहे. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या फ्रँचायझींचे गणित बिघडणार आहे. “खेळाडूंच्या लिलावादरम्यानच आम्ही रणनीती आखली होती. बीसीसीआयने आश्वासन दिल्यामुळेच आम्ही खेळाडूंची निवड केली होती. पण आता आमच्यावर कठीण परिस्थिती ओढवली आहे. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असती तर आम्ही समजू शकलो असतो. पण इंग्लंड बोर्डाने आमची चिंता वाढली आहे. आम्ही बीसीसीआयशी याविषयी बोललो असून तेच यातून काहीतरी मार्ग काढतील, अशी आशा आहे,” असे एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
खेळाडूंची सद्यस्थिती
खेळाडू - संघ - स्थिती
जोस बटलर - राजस्थान रॉयल्स - मायदेशी परतणार
मोईन अली - चेन्नई सुपर किंग्ज - साशंकता
जॉनी बेअरस्टो - पंजाब किंग्ज - मायदेशी परतणार
सॅम करण - पंजाब किंग्ज - साशंकता
लियाम लिव्हिंगस्टोन - पंजाब किंग्ज - साशंकता
फिल सॉल्ट - कोलकाता नाइट रायडर्स- खेळणार
रीस टॉपले - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - साशंकता
विल जॅक्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - साशंकता