मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीरने दिली मुलाखत

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मंगळवारी गौतम गंभीरने मुलाखत दिली. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) झूम कॉलच्या आधारे मुलाखत घेतल्याचे समजते.
मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीरने दिली मुलाखत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मंगळवारी गौतम गंभीरने मुलाखत दिली. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) झूम कॉलच्या आधारे मुलाखत घेतल्याचे समजते. सल्लागार समितीत अध्यक्ष अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे व सुलक्षणा नाईक या तिघांचा समावेश होता.

सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा भारतीय मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नव्या प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येईल, असे समजते. गेल्या काही महिन्यांपासून गंभीर या शर्यतीत अग्रेसर असल्याचे समजते. नवा प्रशिक्षक हा १ जुलैपासून कार्यभार सांभाळेल. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत त्याचा करार असणार आहे. ४२ वर्षीय गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने मे महिन्यात आयपीएलचे जेतेपद काबिज केले. तसेच गंभीरने स्वत: भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल, असे मत काही दिवसांपूर्वी नोंदवले होते.

“गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखत घेण्यात आली. बुधवारी मुलाखतीची दुसरी फेरी होईल. त्यानंत ४८ तासांत पुढील निर्णय घेण्यात येईल,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. गंभीरव्यतिरिक्त मात्र अन्य एखाद्या उमेदवाराची मुलाखत घेण्यात आली आहे का, हे समजू शकलेले नाही.

द्रविड २०२१पासून भारताचा प्रशिक्षक आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर द्रविडने प्रशिक्षकपदाची धुरा वाहिली. त्याच्या प्रशिक्षण कारकीर्दीत भारताने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र दोन्ही वेळेस भारताला जेतेपदाने हुलकावणी दिली. आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषक उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in