Gautam Gambhir: गौतमचे गंभीर पर्व सुरू! भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती; बीसीसीआयची अधिकृत घोषणा

Team India Head Coach: ४२ वर्षीय माजी क्रिकेटपटू गंभीरची मंगळवारी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
Gautam Gambhir: गौतमचे गंभीर पर्व सुरू! भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती; बीसीसीआयची अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये गौतमच्या गंभीर पर्वाला आता प्रारंभ होणार आहे. ४२ वर्षीय माजी क्रिकेटपटू गंभीरची मंगळवारी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा केली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जून महिन्याच्या अखेरीस टी-२० विश्वचषक उंचावला. ११ वर्षांचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणून भारताने दुसऱ्यांदी टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षण कारकीर्दीतील ही अखेरची स्पर्धा होती. २०२१पासून भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या द्रविडने करारात वाढ न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे विश्वचषकाच्या सुरुवातीपूर्वीच नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास प्रारंभ झाला होता. तेव्हापासूनच गंभीरचे पारडे या पदासाठी जड मानले जात होते. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे जेतेपद मिळवले.

गंभीरसह डब्ल्यू. व्ही. रामण यांनीही या पदासाठी मुलाखत दिली होती, असे समजते. मात्र क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) एकमताने गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदासाठी नियुक्ती केली. सल्लागार समितीत अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नाईक या माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता. अखेर जय शहा यांनी मंगळवारी ट्वीट करत गंभीरला शुभेच्छा दिल्या. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत गंभीर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध जुलै महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांपासून गंभीर प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहे.

“भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे स्वागत करताना मला फार आनंद होत आहे. आधुनिक काळात क्रिकेट झपाट्याने बदलत असून गंभीर या खेळातील सर्व बारकावे जाणून आहे. त्यामुळे भारताला आणखी शिखरावर घेऊन जाण्यासाठी तो योग्य व्यक्ती आहे,” असे ट्वीट जय शहा यांनी केले. त्याशिवाय मावळते प्रशिक्षक द्रविड यांचेही शहा यांनी बीसीसीआयने विशेष आभार मानताना त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गंभीरनेसुद्धा ही संधी दिल्यामुळे बीसीसीआयचे आभार मानले व आपण या आव्हानासाठी सज्ज आहोत, असे सांगितले.

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांसारख्या तारांकित खेळाडूंनी टी-२०तून निवृत्ती जाहीर केल्यामुळे गंभीर आता प्रामुख्याने भारताच्या टी-२० संघाची कशाप्रकारे बांधणी करणार, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच टी-२० संघाचा नवा कर्णधार निवडण्यात ही गंभीरची मोलाची भूमिका असेल. गंभीर हा त्याच्या खडूस वृत्ती व स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तसेच त्याची काम करवून घेण्याची पद्धतही अनेकांना न पटणारी असली तरी निकाल मात्र नक्कीच तो संघाच्या बाजूने लावून देतो. त्यामुळे आता क्रिकेटमधील गंभीर पर्व भारतासाठी किती लाभदायी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारत ही माझी ओळख आहे. त्यामुळे देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी असू शकत नाही. आपले खेळाडू १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर यशस्वीपणे पेलतात. प्रशिक्षक म्हणून मीसुद्धा देशाच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व करेन.

- गौतम गंभीर, भारताचा मुख्य प्रशिक्षक

तुम्हाला हे माहीत आहे का?

> गंभीर भारताच्या तिन्ही संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवणार असून त्याच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ डिसेंबर २०२७पर्यंत असेल.

> यादरम्यान १ चॅम्पियन्स ट्रॉफी, २ जागतिक कसोटी अजिंक्यपद, १ एकदिवसीय विश्वचषक, १ टी-२० विश्वचषक अशा एकंदर पाच आयसीसी स्पर्धांचा समावेश आहे.

> एखाद्या आंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्याची त्याची ही पहिलीच वेळ असून यापूर्वी आयपीएलमध्ये त्याने लखनऊ (२०२२, २०२३) आणि कोलकाता (२०२४) या संघांच्या मेटाँरची (मार्गदर्शक) भूमिका बजावली होती.

> खेळाडू म्हणून गंभीर हा २००७च्या टी-२० व २०११च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने २०१२ व २०१४मध्ये आयपीएल जिंकली.

logo
marathi.freepressjournal.in