

चेन्नई : कडाक्याच्या उन्हात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर रंगलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ३७व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ सुपरहीट ठरला. त्यांनी रविवारी दुपारी झालेल्या लढतीत यजमान चेन्नई सुपर किंग्जला ८ गडी व २० चेंडू राखून धूळ चारली. यामुळे सलग दोन पराभवांनंतर गुजरातचा संघ विजयपथावर परतला, तर चेन्नईला एकंदर पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (२५ धावांत ३ बळी) आणि साई सुदर्शन (४६ चेंडूंत ८७ धावा) गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. आता प्रत्येक संघाचे किमान ७ ते ८ सामने झाले असून गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होणार आहे. त्यामुळेच ज्वर हळूहळू वाढणार आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात गुजरातने चेन्नईने फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ७ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. खेळपट्टी आव्हानात्मक नक्कीच होती. त्यातच रबाडाने चेन्नईच्या फलंदाजांना चुकीचे फटके खेळण्यास भाग पाडले. रबाडाने धोकादायक संजू सॅमसन (११), उर्विल पटेल (४) यांना चौथ्या षटकातच माघारी पाठवले. मग मोहम्मद सिराजने सर्फराझ खानचा शून्यावरच अडसर दूर केला. फिरकीपटू मानव सुतारने डेवाल्ड ब्रेविसला (२) बाद करून चेन्नईची ४ बाद ३७ अशी अवस्था केली. १० षटकांपर्यंत चेन्नईने फक्त ४३ धावा केल्या होत्या.
तेथून मग कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि अनुभवी शिवम दुबे यांनी संघाला सावरले. विशेषत: रशिद खानच्या एकाच षटकात त्यांनी २१ धावा लुटल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भर घातली. अखेरीस अर्शद खानने दुबेला २२ धावांवर बाद केले. त्यानंतर कार्तिक शर्मा (१५) व जेमी ओव्हर्टन (१८) यांनीही मोलाचे योगदान दिले. ऋतुराजने एक बाजू सांभाळून धरताना यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. त्याने ६ चौकार व ४ षटकारांसह ६० चेंडूंत नाबाद ७४ धावा फटकावल्या. त्यामुळेच चेन्नईने किमान १५० धावांचा पल्ला गाठला.
त्यानंतर गुजरातने मात्र लक्ष्याचा सहज पाठलाग करताना १६.४ षटकांत विजय मिळवला. सुदर्शनने नेत्रदीपक खेळी साकारताना ४६ चेंडूंतच ४ चौकार व ७ षटकारांसह ८७ धावांची घणाघाती खेळी साकारली. गेल्या लढतीत सुदर्शनने शतकदेखील साकारले होते. कर्णधार शुभमन गिलसह सुदर्शनने ५८ धावांची सलामी नोंदवली. गिल ३३ धावांवर यष्टिचीत झाला. मात्र अनुभवी जोस बटलरच्या साथीने सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचून विजय पक्का केला. १७व्या षटकात सुदर्शन बाद झाला. मात्र वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने त्याच षटकात बटलरने षटकार लगावून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बटलरने ३० चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या. रबाडाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
एकंदर आठ सामन्यांतील चौथ्या विजयासह गुजरातने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. दुसरीकडे चेन्नईला आठ सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते सहाव्या स्थानी घसरले. मुकेश कुमारच्या गोलंदाजीची चेन्नईला उणीव भासली. कारण त्यांनी सामन्याच्या चौथ्याच षटकात इम्पॅक्ट प्लेयरच्या स्वरूपात सर्फराझला आणले. आता गुजरातचा पुढील सामना गुरुवारी बंगळुरूविरुद्ध होईल, तर चेन्नईचा संघ शनिवारी मुंबईविरुद्ध पुढील लढत खेळणार आहे.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ७ बाद १५८ (ऋतुराज गायकवाड नाबाद ७४; कगिसो रबाडा ३/२५) पराभूत वि.
गुजरात टायटन्स : १६.४ षटकांत २ बाद १६२ (साई सुदर्शन ८७, जोस बटलर नाबाद ३९)
सामनावीर : कगिसो रबाडा