

नवी दिल्ली : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मंगळवारी तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून माझे कर्तव्य मी पूर्ण केले आहे. आता पुन्हा खेळाच्या प्रेमासाठी खेळण्याची वेळ आली आहे, असे ३७ वर्षीय हरमनप्रीतने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. नुकताच झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय समोर आला आहे.
गुवाहाटी येथे पार पडलेल्या या बैठकीत संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजीत सैकिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला हरमनप्रीतसह स्मृती मानधना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार उपस्थित होते. हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर आता ३० वर्षीय स्मृती मानधनाकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, हरमनप्रीतने २०१६ मध्ये टी-२० संघाचे नेतृत्व हाती घेतले होते. त्यानंतर २०२२ मध्ये तिने एकदिवसीय संघाची धुरा सांभाळली आणि २०२३ मध्ये ती सर्व प्रकारांत भारताची कर्णधार बनली. तिच्या नेतृत्वाखाली भारताने गतवर्षी पहिलावहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. तसेच २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रौप्यपदक मिळवले होते. तिने एकूण ५ कसोटी, ५१ एकदिवसीय आणि १५५ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.
मात्र, यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरी गाठता आली नाही. त्याचबरोबर फलंदाज म्हणूनही तिच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले. किंबहुना हरमनच्या कारकीर्दीत टी-२० प्रकारांतील विश्वचषकांत भारताची कामगिरी ढासळलेलीच राहिली आहे. २०२०मध्ये भारताने फक्त एकदाच तिच्या नेतृत्वात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
“आज मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय सोपा नव्हता. यामध्ये अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर स्मरणात राहतील असे क्षण आहेत. कर्णधारपद आज संपले आहे, पण भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीच संपणार नाही. आता मी पुन्हा केवळ खेळाच्या प्रेमासाठी खेळण्यास तयार आहे. कर्णधारपद संपले, पण प्रवास सुरूच आहे,” असे हरमनप्रीत म्हणाली.
तिने पुढे सांगितले की कर्णधार म्हणून अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले आणि अनेकदा वैयक्तिक ध्येयांपेक्षा संघाला प्राधान्य दिले. “मी माझे रक्त, घाम, वेळ आणि अनेकदा माझ्या स्वतःच्या खेळाचा व वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा त्याग केला,” असे तिने भावनिकपणे नमूद केले. कर्णधारपद सोडताना आपल्या मनात असंख्य भावना असल्या तरी समाधान आहे, असेही हरमनप्रीतने सांगितले.
महिलांच्या आयपीएलमध्ये हरमनप्रीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. तिच्या नेतृत्वात मुंबईने २०२३ व २०२५मध्ये डब्ल्यूपीएलचे जेतेपद काबिज केले. एकूणच हरमनप्रीतचा अनुभव भारतासाठी यापुढेही मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून तिच्याकडे लक्ष असेल.
कर्णधार म्हणून कामगिरी
कालावधी : २०१६ ते २०२६
कसोटी : ५ सामने l एकदिवसीय : ५१ सामने
टी-२० : १५५ सामने
विजेतेपद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२५
सुवर्णपदक : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३, २०२६
रौप्यपदक : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२