'अशी कशी ओढ बाई'

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ शक्य तितक्या लवकर जाहीर करून वेळीच तयारीला लागायला हवे.
'अशी कशी ओढ बाई'

तमाम क्रिकेटशौकिनांना ओढ लागून राहिलेली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अगदी जवळ येऊन ठेपल्याने अनेक मातब्बर संघ जोरदार तयारीला लागले आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाचे काय चालले आहे, तेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे ‘काय समजंना, काय उमजंना...’ अशीच सर्वसामान्य क्रिकेटशौकिनांची अवस्था झाली असणार, खरोखरच. संभाव्य टीम इंडियाबाबत उत्सुक असलेले शौकीन वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त करीत आहेत. तेव्हा ही ‘कुजबुज कुजबुज कसली...’, याची जाणीव ठेवत टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ शक्य तितक्या लवकर जाहीर करून वेळीच तयारीला लागायला हवे.

वास्तविक, जागतिक क्रिकेटची बादशाही मिळविण्याआधी आशियाई क्रिकेटमधील दादागिरी सिद्ध करून टी-२०च्या रणांगणात प्रतिस्पर्ध्यांवर आयताच दबाव आणण्याची नामी संधी टीम इंडियाने वाया दवडली. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-४मध्येच भारताला गाशा गुंडाळावा लागला. भारताने प्रयोग करण्याचा अट्टाहास कायम ठेवल्याने त्याची किंमत भारताला मोजावी लागली. टीम इंडियाने महत्त्वाच्या स्पर्धा जवळ आलेल्या असताना प्रयोग करायला नको होते. जेव्हा जागतिक स्पर्धा नसतात, तेव्हा प्रयोग वगैरे ठीक असतात. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गेल्या एक वर्षापासून केलेली संघाची जुळवाजुळव अनेकांना आकलनापलीकडची वाटली. कारण ही जुळवाजुळव निष्पळ ठरली.

गेल्या विश्वचषकापासून भारताने टी-२० क्रिकेटमधील प्लेइंग-११मध्ये तब्बल २८ खेळाडूंना आजमावून पाहिले. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमधील कोणीही स्थिर राहू शकला नाही. कोणत्याही खेळाडूला विशिष्ट क्रमावर फलंदाजीचा फारसा अनुभव मिळाला नाही. याउलट, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघांनी बहुतांश सामन्यांमध्ये समान संघ ठेवल्याने त्यांना आशिया चषक स्पर्धेत घवघवीत यश मिळाले. श्रीलंकेने केवळ २२, तर पाकिस्तानने १९ खेळाडू आजमावून पाहिले होते. त्यातच भारताने गेल्या एका वर्षभरातच आठ वेगवेगळ्या खेळाडूंकडे नेतृत्व सोपविले. ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा या तीन कर्णधारांचा तर सध्याच्या प्लेइंग-११मध्ये समावेश आहे. त्यामुळे एकाच कर्णधाराच्या ध्येयधोरणाखाली जो मजबूत संघ तयार होतो, तसे होऊ शकले नाही. आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत टीम इंडियासाठी केवळ तीन प्रमुख गोलंदाजांची निवड झाली. चौथा मध्यमगती गोलंदाज म्हणून अष्टपैलू हार्दिक पंड्याने कामगिरी बजावली. आवेश खान आजारी पडताच भारतीय संघ असमतोल झाला. आवेशला पर्याय ठरणारा दुसरा वेगवान गोलंदाजच संघात उपलब्ध नव्हता. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. ‘खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारा आणा’ अशीच टीम इंडियाची गत झाली, जणू.

बरे, आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यामध्ये तरी हे प्रयोग थांबावेत ना? पण नाही! काही कारण नसताना प्रयोग केलेच. रोहित शर्माला विश्रांती हवी होती, म्हणे. त्यामुळे विराट कोहली हा के. एल. राहुलसमवेत सलामीला आला. रोहितच्या अनुपस्थितीत राहुलला आणखी एका सामन्यात बॉस होण्याचा चान्सही मिळाला. विराटने तब्बल एक हजार २० दिवसांनंतर शानदार शतक झळकावत आपला फॉर्म सिद्ध केला, ही जमेची बाजू असली, तरी रोहितने एकमेव सामन्यात विश्रांती घेऊन काय साधले? ‘‘रोहित शर्माला विश्रांती हवी होती. टीम मॅनेजमेंटलादेखील असेच वाटले. कारण टी-२० वर्ल्डकप कालावधीत मॅनेजमेंटला खेळाडू फ्रेश हवेत. बॅक टू बॅक सामने खेळणे सोपे नाही,’’ असे राहुलने टॉसच्या वेळी सांगितले; परंतु विश्रांतीनंतर आता सराव सत्रात रोहितला घाम गाळावा लागेलच ना! त्यापेक्षा हा शेवटचा सामना खेळून सरावाचेही काम भागले असते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या एकूण धावांमध्येही भर पडली असती. कुणी सांगावे, एखादा विक्रमही घडून गेला असता, कदाचित. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने आपल्या चार षट्कात अवघ्या चार धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या, हे उत्तम झाले. त्याला त्याची लय सापडली. हे सातत्य त्याने आता टिकवायला हवे. अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा उडवत भारताने शेवट गोड केला खरा; पण एवढ्यानेच समाधान मानायचे का? खरी गोडी तर टी-२० विश्वचषकात चाखायची आहे ना! त्यासाठी प्रत्येक बाब ही गांभीर्यपूर्वक घेतली पाहिजे.

कहर म्हणजे, अफगाणिस्तानविरुद्ध दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांना संधी देण्यात आल्यानंतर ऋषभने यष्टीरक्षण केले. त्यातच कार्तिकला फलंदाजीही मिळू शकली नाही. ना बॅटिंग ना कीपिंग म्हणून की काय, कार्तिकने चक्क अखेरचे २०वे षट्क टाकले. आता बोला! कार्तिकला गोलंदाजी करताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले नसते तरच नवल. २००४ मध्ये क्रिकेट पदार्पण केलेल्या कार्तिकने १८ वर्षांमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी केली. हा प्रकारच अनाकलनीय होता, मुळी. त्याच्या षट्कात एकूण १८ धावा निघाल्या. पहिल्या चेंडूवर दोन धावा त्याने दिल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षट्कार लगावले गेले. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन धावा आल्या आणि सहाव्या चेंडू निर्धाव ठरला. आता ही कार्तिकचीच बॉलिंग टाकण्याची ओढ होती की कर्णधाराची चाल होती, ते कार्तिकच जाणे. कार्तिकऐवजी एखाद्या नियमित गोलंदाजाला संधी दिली असती तर शेवटचे षट्क टाकण्याचा त्याला सराव मिळून त्याचा आत्मविश्वास तरी वाढला असता, हमखास. टी-२० विश्वचषकाबाबत कोणीच कसे गंभीर का नाही? काही देशांचे संघही जाहीर झाले. कर्णधार रोहित म्हणतो की, ९५ टक्के संघ बांधणी झाली आहे. मग आणखी कसल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत? आशिया चषक स्पर्धेत फलंदाजीच्या एकच एक क्रमवारीसह ठोस संघ उभा केला असता तर प्रत्येकाची जबाबदारी निश्चित होऊन संघ पक्का झाला असता; पण प्रत्येकाला संधी आणि विश्रांती (सुद्धा) देण्याचा हट्टच असेल तर कोणी काय बोलावे? या अनाकलनीय धोरणामुळे ‘बैल गेला नि झोपा केला’, असे होऊ देता कामा नये, खचितच.

खेळाडूंची बेपर्वाईदेखील किती! स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला अशी काही दुखापत झाली की, टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची वेळ त्याच्यावर ओढवली. त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दुबईमध्ये एक अ‍ॅडवेंचर अॅक्टिविटी करत असताना जडेजाला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. टीम इंडियाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये वॉटर बेस्ड ट्रेनिंग अ‍ॅक्टिविटीमध्ये भाग घेतल्याने त्याला दुखापत झाली, अशी माहिती मिळत आहे. विशिष्ट स्की-बोर्डवर पाण्यात स्वतःचा समतोल साधण्यात त्याला अपयश आले. तो घसरून पडला आणि त्याचा गुडघा मोडला. ही अ‍ॅडवेंचर ॲक्टिविटी बीसीसीआयच्या प्रशिक्षण नियमावलीचा भाग नसतानाही परवानगीशिवाय त्याने साहसी उपक्रमात सहभाग घेतला. ‘खट्याळ पाणी गातंय गाणी, गुणुगुणु का गुणुगुणु...’ असे जडेजाला का बरे वाटले? ‘अशी कशी ओढ बाई, असं कसं वेड, विचारू कुणाला?’ असे त्याला आता वाटत असेल, तर त्याने स्वतःच्याच ‘मनाला मनाला’ विचारावे. हे दु:साहस जडेजाला भलतेच महागात पडले! संघात स्थान मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा असल्याचे भान ठेवायचे भले राहो, निदान टी २० विश्वचषक जवळ आल्याची जाण तरी त्याने ठेवायला हवी होती. त्याने २०२२ मध्ये नऊ सामन्यांत अवघ्या पाच विकेट्स घेतल्या असल्या, तरी फलंदाजीत मात्र ५० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये त्याला दम दाखविता आला नसला, तरी यावर्षी त्याने खेळलेल्या नऊ सामन्यांत ५०.२५च्या सरासरीने २०१ धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट १४१.५४ इतका होता. आता गेले ना सारेच मुसळ केरात (पाण्यात!).

जडेजा वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही खेळू शकला नव्हता. आशिया चषकापूर्वी भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या मालिकेतही जडेजा संघाचा भाग नव्हता. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला त्यावेळी निवड समितीने विश्रांती दिल्याचे सांगितले जात होते. त्यावेळीही त्याच्या उजव्या गुडघ्यालाच दुखापत झाली, हाही योगायोगच म्हणायचा! आशिया चषक तर हातचा निसटला, आता टी-२० विश्वचषक तरी हातातून जाऊ नये म्हणून टीम इंडियाने हातचे काहीही राखून ठेवता कामा नये, असे समस्त भारतीयांना वाटत आहे. जगात अभिमानाने मान ताठ होण्यासाठी टीम इंडियाने हातात वर्ल्डकप उंचावलेला पाहण्याची ओढ भारतीयांना लागली आहे.

हात ढिले सोडा आणि कामाला लागा, असेच फर्मान नियामक मंडळ, व्यवस्थापन, प्रशिक्षक, कर्णधार यांनी टी-२० विश्वचषकासाठी संघनिवड जाहीर होताच काढायला हवे. बालुशाहीप्रमाणे गोड विजयाची चव चाखत जागतिक क्रिकेटमध्ये बादशाही सिद्ध करायची असेल, तर कठोर परिश्रमाला आता पर्याय नाही, हे प्रत्येक संबंधितांनी ध्यानात ठेवले पाहिजे, निश्चितच.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in