
वर्ष २०२२ हे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. यावर्षी भारतीय संघाने चांगली कामगिरी केली असून टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे. अशामध्ये आयसीसीने आपली सर्वोत्तम टी २० वर्ष २०२२च्या ११ खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघामधील ३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू म्हणजे विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या आहेत. या ११ खेळाडूंच्या संघाचे कर्णधार पद हे इंग्लंडच्या जॉस बटलरला देण्यात आले आहे.
२०२२ या वर्षात टी २० क्रिकेटमध्ये भारताचा सूर्यकुमार यादवची कामगिरी दमदार राहिली आहे. त्याने या वर्षामध्ये १,१६४ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. त्याने या वर्षात ६०७ धावा केल्या असून तब्बल २० विकेट्स घेतल्या आहेत. तर, भारताचा रणमशीन विराट कोहलीने या वर्षात २० सामन्यात ७८१ धावा केल्या असून १ शतक आणि ८ अर्धशतके केली आहेत.
असा आहे आयसीसी टी २०चा सर्वोत्तम संघ
जॉस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मोहम्मद रिजवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सैम कुर्रन, वानिंदु हसरंगा, हारिस रऊफ आणि जोश लिटिल