आयसीसीने भारताच्या नकारामागील स्पष्टीकरण द्यावे; पीसीबीची भूमिका, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आयोजन प्रकरण

पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळण्यास सुरक्षेच्या कारणास्तव भारताने नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) स्पष्टीकरण मागितले आहे.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (डावीकडे)
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (डावीकडे)
Published on

नवी दिल्ली : पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळण्यास सुरक्षेच्या कारणास्तव भारताने नकार दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) स्पष्टीकरण मागितले आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची थेट प्रतिक्रिया उपलब्ध झाली नसली, तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत खेळणार नसल्याचे केवळ आम्हाला कळविण्यात आले आहे. या संदर्भात कारणासहित कुठलेही स्पष्टीकरण ‘आयसीसी’ने दिलेले नाही. स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून आजपर्यंत स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार (हायब्रीड मॉडेल) खेळविण्याविषयी कुठलीही चर्चा झाली नव्हती. मग मध्येच हा विषय कसा काय आला, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे म्हणणे आहे.

भारत सरकारची परवानगी नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ने आपला संघ स्पर्धेसाठी पाठविण्यास नकार दिला असे चर्चेत आहे. भारत सरकारच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांची आम्ही वाट पाहात आहोत. पाकिस्तान क्रिकेट मंडळ आता पाकिस्तान सरकारशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचेही या सूत्राने सांगितले. पाकिस्तान सरकारने ‘आयसीसी’ स्पर्धाच नाही, तर ‘बीसीसीआय’शी क्रिकेट संबंध तोडण्यासच सांगितले, तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला असे टोकाचे पाऊल उचलावे लागेल. असे झाल्यास सर्वाधिक फटका ‘आयसीसी’ला बसू शकतो.

केवळ भारत, पाकिस्तान दरम्यानच्या लढतीतून ‘आयसीसी’ला सर्वाधिक महसूल मिळतो म्हणून नाही, तर चॅम्पियन्स स्पर्धेत क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम संघ खेळतील असा विश्वास ‘आयसीसी’ने प्रसारण कंपनी, प्रायोजक यांना दिला आहे. त्यामुळे यापैकी एका देशाने जरी माघार घेतली, तरी ‘आयसीसी’ला ते परवडणारे नाही. पाकिस्तान मंडळाला भारताशी क्रिकेट संबंध तोडण्याचा निर्णय घ्यावाच लागला तर, पाकिस्तानचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र, या वेळी पाकिस्तान मंडळाने ठोस भूमिका घेत येणाऱ्या संकटाचा सामना करण्याची तयारी दर्शविली आहे.

२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात.

logo
marathi.freepressjournal.in