
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान प्रेक्षकसंख्येचे विक्रम रचले गेले. त्यामुळे आघाडीचे संघ एकमेकांविरुद्ध खेळत असल्यास प्रेक्षकांना कसोटी सामने पाहण्यात अजूनही रस असल्याचे सिद्ध झाले. आता याच पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या आघाडीच्या मंडळांना हाताशी घेत कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी द्विस्तरीय प्रणालीचा अवलंब करण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र काही माजी क्रिकेटपटू तसेच अन्य देशांना यास विरोधही दर्शवला आहे.
या प्रणालीअंतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या तीन प्रमुख देशांमध्ये अधिक मालिका कशा खेळल्या जातील याचा विचार करण्यात येणार आहे. दुसरीकडे फारसे क्रिकेट न खेळणाऱ्या संघांमध्ये मालिका, असे द्विस्तरीय वर्गीकरण केले जाऊ शकते. ‘आयसीसी’चे नवे अध्यक्ष जय शहा या महिन्याच्या अखेरीस क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेअर्ड आणि इंग्लंडचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्प्सन यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. अर्थात, अजून हे सर्व चर्चेपुरते मर्यादित असून, निर्णयापर्यंत काहीच आलेले नाही. निर्णय घेण्यात आला तरी अशा प्रकारची योजना ही २०२७ पासूनच प्रत्यक्षात आणली जाऊ शकेल. तोपर्यंत सध्याचा मालिका कार्यक्रम पूर्ण केला जाईल.
प्रमुख देशांमध्ये अधिक कसोटी सामने खेळवले गेले, तर प्रेक्षकांची संख्या निश्चित वाढेल आणि कसोटी क्रिकेटचे आकर्षण कायम राहील, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान समालोचन करताना मांडले होते. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही सध्याच्या रचनेवर नाराज आहे. ही योजना यापूर्वीही चर्चेत आली होती. त्यावेळी ‘बीसीसीआय’नेच याला विरोध केला होता. झिम्बाब्वे आणि बांगलादेश या मर्यादित क्रिकेट खेळणाऱ्या देशांचाही याला विरोध होता. या पद्धतीने महसूलाचे प्रमाण कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. बीसीसीआयच्या येत्या १२ जानेवारीस होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये याविषयी नक्कीच चर्चा होईल.
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेनंतर आता जूनमध्ये होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. जूनमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघांत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.