'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

रिंकू, शिवम दुबे व हार्दिक पंड्या या तिघांपैकी दोघांचीच निवड शक्य असल्याने रिंकूला बळी द्यावा लागला, अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

नवी दिल्ली : इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे रिंकूला या आयपीएलमध्ये फक्त एकदाच पहिल्या पाच क्रमांकात फलंदाजी करण्याची संधी लाभली. त्यामुळे त्याला कौशल्य दाखवता आले नाही. रिंकू, शिवम दुबे व हार्दिक पंड्या या तिघांपैकी दोघांचीच निवड शक्य असल्याने रिंकूला बळी द्यावा लागला, अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

२ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार असून या स्पर्धेसाठी ३० एप्रिल रोजी भारताचा १५ सदस्यीस संघ जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत हार्दिक उपकर्णधार असेल, तर शिवमलाही फलंदाजीच्या बळावर स्थान लाभले आहे. शिवमने आयपीएलमध्ये चेन्नईकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली. तसेच तिसऱ्या अथवा चौथ्या स्थानी फलंदाजी केली. मात्र कोलकाताकडून खेळणाऱ्या २६ वर्षीय रिंकूला ८ डावांत फक्त ८२ चेंडूच खेळता आले. यांपैकी एकदाच त्याला पहिल्या पाच क्रमांकात फलंदाजी करता आली. कोलकातामध्ये फिल सॉल्ट, सुनील नरिन, अंक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर व आंद्रे रसेल हे सर्व फलंदाज रिंकूच्या आधी येतात.

“रिंकूला इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा नक्कीच फटका बसला. श्रेयस व वेंकटेश यांचा संघ निवडीसाठी विचारही केला गेला नाही. त्यामुळ‌े रिंकूने काही सामन्यांत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणे अपेक्षित होते. शिवम सातत्याने छाप पाडत असला तरी तो गोलंदाजी करत नाही. त्यामुळे हार्दिकची निवड होणे स्वाभाविक होते. सध्या भारताकडे तोच मध्यमगती गोलंदाजी करू शकेल, असा अष्टपैलू आहे. अशा स्थितीत रिंकूला १५ खेळाडूंत स्थान मिळणे कठीण होते,” असे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

रिंकूला विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आले आहे. २५ मेपर्यंत १५ खेळाडूंतील एखादा जण जायबंदी झाला तर रिंकूचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in