चेन्नई : रवींद्र जडेजा (१८ धावांत ३ बळी), तुषार देशपांडे (३३ धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीनंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूंत नाबाद ६७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये सोमवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्सला ७ गडी आणि १४ चेंडू राखून धूळ चारली. चेन्नईचा हा पाच सामन्यांतील तिसरा विजय ठरला, तर कोलकाताला चार लढतींमध्ये प्रथमच पराभव पत्करावा लागला.
चेपॉक स्टेडियमवरील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला २० षटकांत जेमतेम ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारता आली. जडेजाने सुनील नरिन (२७), अंक्रिश रघुवंशी (२४), वेंकटेश अय्यर (३) यांचे बळी मिळवले. तर मुंबईकर देशपांडेने आंद्रे रसेल (१०), फिल सॉल्ट (०), रिंकू सिंग (९) या धोकादायक फलंदाजांना माघारी पाठवले. कर्णधार श्रेयस अय्यरने ३४ धावांची झुंज दिली.
त्यानंतर रचिन रवींद्र (१५) लवकर बाद झाल्यावर ऋतुराजने ९ चौकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. त्याला डॅरेल मिचेल (२५) आणि शिवम दुबे (२८) यांची उत्तम साथ लाभली. ऋतुराज-मिचेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. मग महेंद्रसिंह धोनीच्या (नाबाद १) साथीने चेन्नईने १७.४ षटकांत विजय मिळवला. जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
जायबंदी मयांक किमान दोन सामन्यांना मुकणार
लखनऊचा गोलंदाज मयांक यादव स्नायूंच्या दुखापतीमुळे किमान दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. लखनऊचे संघमालक विनोद बिश्त यांनी याविषयी माहिती दिली. १५६ किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या २१ वर्षीय मयांकला गुजरातविरुद्धच्या लढतीत १ षटक टाकल्यानंतर मैदान सोडावे लागले होते. आता तो १२ एप्रिलला दिल्लीविरुद्ध आणि १४ एप्रिलला कोलकाताविरुद्ध खेळण्याची शक्यता फार कमी आहे.