बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. बाद फेरीतील तीन संघ पक्के झाले असून शनिवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर या शर्यतीतील चौथा संघ कोण, हे स्पष्ट होईल. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर घरच्या मैदानात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे कडवे आव्हान असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मात्र या लढतीत पाऊस खोळंबा करण्याची दाट शक्यता असून तसे झाल्यास बंगळुरूच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते.
फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरूने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत सलग पाच सामने जिंकून बाद फेरीसाठी दावेदारी पेश केली आहे. पहिल्या आठपैकी बंगळुरूने फक्त १ लढत जिंकली होती. मात्र त्यानंतर सांघिक खेळ उंचावल्यामुळे बंगळुरूचा संघ आता बाद फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे. गेल्या लढतीत बंगळुरूने दिल्लीला धूळ चारली. चिन्नास्वामीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाची रिमझिम चालू आहे. तसेच शनिवारीही सायंकाळी ७च्या सुमारास पावसाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. बंगळुरूला फक्त विजयच बाद फेरीत नेऊ शकतो. पराभव अथवा सामना रद्द झाला, तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. बंगळुरूच्या खात्यात सध्या १३ सामन्यांतील ६ विजयांचे १२ गुण असून तूर्तास ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेत्या चेन्नईने गेल्या लढतीत राजस्थानला नमवले. १३ सामन्यांतील ७ विजयांच्या १४ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे शनिवारी १ धावेच्या फरकाने विजय मिळवला, तरी चेन्नईचा संघ आगेकूच करेल. बंगळुरूविरुद्ध चेन्नईची आकडेवारीसुद्धा उत्तम आहे. उभय संघांतील या हंगामाच्या पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूला नेस्तनाबूत केले होते. आता बंगळुरू त्या पराभवाचा वचपा घेणार की चेन्नई पुन्हा त्यांना नामोहरम करणार, याचे उत्तर लवकरच मिळेल.
विराट, सिराजवर बंगळुरूची मदार
इंग्लंडचा विल जॅक्स माघारी परतल्यामुळे बंगळुरूला काहीसा धक्का बसला आहे. मात्र ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ६६१ धावांसह अग्रस्थानी असलेला विराट व सध्या दमदार लयीत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यामुळे बंगळुरूचा संघ वेगळ्याच जोशात खेळत आहे. गेल्या पाचही सामन्यांत विराटची बॅट तळपली आहे. तसेच डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, रजत पाटिदार उत्तम योगदान देत आहेत. ग्लेन मॅक्सवेलकडून बंगळुरूला कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. गोलंदाजीत सिराजव्यतिरिक्त लॉकी फर्ग्युसन, यश दयाल या वेगवान जोडीवर तसेच फिरकीपटू कर्ण शर्मावर बंगळुरू अवलंबून आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करून २००हून अधिक धावा केल्यास, त्यांचे गोलंदाज नक्कीच बचाव करू शकतील.
ऋतुराज, धोनीवर चेन्नईची भिस्त
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ५८३ धावांसह दुसऱ्या स्थानी असलेला ऋतुराज आणि मुंबईचा डावखुरा फलंदाज शिवम दुबे यांच्यावर चेन्नईची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे. त्याशिवाय धोनीच्या कारकीर्दीतील ही बंगळुरू येथील अखेरची आयपीएल लढत ठरू शकते. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते आतुर असतील. रवींद्र जडेजा, रचिन रवींद्र व डॅरेल मिचेल असे फलंदाजही चेन्नईच्या ताफ्यात आहेत. मात्र राजस्थानविरुद्ध गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे चेन्नईचा आत्मविश्वास उंचावला असेल. मथिशा पाथिराना व मुस्तफिजूर रहमान यांच्या अनुपस्थितीत तुषार देशपांडे, शार्दूल ठाकूर या भारतीय गोलंदाजांनी जबाबदारी उचलली असून फिरकीपटू महीष थिक्षणा तसेच मध्यमगती गोलंदाज सिमरजीत सिंग त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे कागदावर तरी चेन्नईचे पारडे जड दिसत आहे.
उभय संघांत आयपीएलमध्ये झालेल्या ३२ सामन्यांपैकी चेन्नईने २१, तर बंगळुरूने १० लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. आकडेवारी चेन्नईच्या बाजूने असली तरी बंगळुरू त्यांना धक्का देऊ शकते.
असे आहे समीकरण
सध्या चेन्नईची धावगती ०.५२८ इतकी आहे, तर बंगळुरूची धावगती ०.३८७ इतकी आहे.
बंगळुरूने ही लढत प्रथम फलंदाजी केल्यास १८ धावांच्या फरकाने, तर लक्ष्याचा पाठलाग केल्यास १० चेंडूंच्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे.
लढत पावसामुळे रद्द झाली अथवा बंगळुरूने आवश्यक फरकासह लढत जिंकली नाही, तर चेन्नई बाद फेरीसाठी पात्र ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, करन शर्मा, मनोज भडांगे, मयांक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा, रंजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महीष थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अरावेल्ली अविनाश, रिचर्ड ग्लीसन.