भारत - पाक मालिकेची शक्यता नाही - बीसीसीआयची स्पष्टोक्ती

पाकिस्तान क्रिकेट बोर्डही (पीसीबी) भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी सामने खेळवण्यास उत्सुक नसल्याचे वृत्त आहे
भारत - पाक मालिकेची शक्यता नाही - बीसीसीआयची स्पष्टोक्ती

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्या बंद असलेली द्विपक्षीय मालिका पूर्ववत सुरू होण्याची नजीकच्या काळात कोणतीही शक्यता नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्टपणे केले. उभयपक्षी कोणत्याही मालिकेचा निर्णय संपूर्णत: भारत सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डही (पीसीबी) भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी सामने खेळवण्यास उत्सुक नसल्याचे वृत्त आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित करण्याचा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ठेवलेला प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ईसीबीने भारत आणि पाकिस्तान मालिकेवर पीसीबीशी चर्चा करणे थोडे विचित्र आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही मालिकेचा निर्णय बीसीसीआय नव्हे, तर भारत सरकार करेल. सध्या हीच स्थिती आहे. आम्ही पाकिस्तानविरुद्ध फक्त आयसीसीच्या स्पर्धेत खेळणार आहोत. नजीकच्या काळात उभयपक्षी मालिकेच्या नियोजनात कोणतीही शक्यता नाही. पुढील काही वर्षात असे काही होण्याची शक्यता नाही.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या महिनाभरात दोन टी-२० सामने झाले. आता पुढील महिन्यात आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघात २३ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. अशातच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.

ईसीबीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय कसोटी मालिका आयोजित करण्याचा औपचारिक प्रस्ताव दिला आहे. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार ईसीबीचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी हा प्रस्ताव दिला आहे. इंग्लंड सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांत सात सामन्यांची टी-२० मालिका सुरू असून त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी यासंदर्भात चर्चा केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची मालिका आयोजित करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेरची द्विपक्षीय मालिका २०१२मध्ये झाली होती. तर अखेरची कसोटी मालिका २००७ मध्ये झाली होती.

इंग्लंडचे आर्थिक हितसंबंध

टेलिग्राफने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका का झाली पाहिजे, याची कारणे देखील ईसीबीने दिली आहेत. इंग्लंडमध्ये हे सामने पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण तेथे दक्षिण आशियातील लोकसंख्या अधिक आहे. याशिवाय प्रायोजिक म्हणून मोठी रक्कम मिळेल आणि टीव्हीवरदेखील प्रेक्षक पाहू शकतील, असा त्यांचा अंदाज आहे. वृत्तात म्हटले आहे की, पीसीबी देखील भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी सामने खेळवण्यास उत्सुक नाही; पण त्यांनी या प्रस्तावासाठी ईसीबीचे आभार मानले आहेत. इंग्लंड बोर्डाने स्वत:च्या फायद्यासाठी हा प्रस्ताव दिला असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in