
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयासह भारताने आशिया कपचे ९ वे जेतेपद पटकावले. सामन्याचा खरा हिरो ठरला तिलक वर्मा, ज्याने झुंज देत नाबाद अर्धशतक ठोकले आणि संघाला विजयी केले. भारत अंतिम मॅच तर जिंकला पण, गेल्या २१ दिवसांत पाकिस्तानला भारताने तिसऱ्यांदा धूळ चारली.
पाकिस्तानची घसरण
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान (३८ चेंडूत ५७ धावा) आणि फखर जमान (३५ चेंडूत ४६ धावा) या जोडीने दमदार सुरुवात दिली. परंतु, या दोघांव्यतिरिक्त कोणताही फलंदाज ठसा उमटवू शकला नाही. सॅम अयुबने १४, तर उर्वरित फलंदाजांनी एक अंकी धावसंख्या गाठली.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या जादुई गोलंदाजीने ४ बळी घेतले. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. परिणामी पाकिस्तानची धावफलक १९.१ षटकांत १४६ धावांवर कोसळली. शेवटच्या ३३ धावांत त्यांनी तब्बल ९ विकेट्स गमावल्या.
भारताची डळमळीत सुरुवात
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चिंताजनक होती. अभिषेक शर्मा (५), शुभमन गिल (१२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१) लवकरच बाद झाले. भारतीय संघ ३५ धावांवर ३ बाद अशा संकटात सापडला होता.
तिलक वर्माची लढाऊ खेळी
अशा वेळी तिलक वर्माने डाव सांभाळत शानदार खेळी केली. त्याने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. त्याला संजू सॅमसनने (२१ चेंडूत २४) साथ दिली. संजू बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात आला. त्याने २२ चेंडूत ३३ धावांची तडाखेबाज खेळी करीत तिलकसोबत निर्णायक भागीदारी रचली. शेवटी, रिंकू सिंगने विजयी चौकार मारत भारताला १४७ धावांचे लक्ष्य गाठून दिले.
भारताचा सलग विजय
गतविजेता भारताने पुन्हा एकदा आशिया कपवर वर्चस्व गाजवले. तिलक वर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या विजयाने भारताने केवळ आशिया कप जिंकला नाही, तर पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यातील आपली ऐतिहासिक कामगिरीही कायम ठेवली. हा सामना भारतीय क्रिकेटच्या नव्या पिढीच्या दमदार कामगिरीचे प्रतीक ठरला, ज्यात तिलक वर्मा सारख्या तरुण खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारत भविष्याची दिशा स्पष्ट केली.