Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. येत्या रविवारी (दि.१४) दुबईमध्ये भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना होणार आहे.
Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली
Published on

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. येत्या रविवारी (दि.१४) दुबईमध्ये भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना रद्द करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

ही सुनावणी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिका लॉ शिकत असलेल्या चार विद्यार्थिनींनी उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली दाखल केली होती.

...यासाठी दाखल केली याचिका

या याचिकेत, अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे राष्ट्रीय भावना व प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे नमूद केले होते. त्यांच्या मते, सैनिकांच्या बलिदानानंतर अशा देशाशी क्रिकेट खेळल्यास शहीदांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. राष्ट्रहित, नागरिकांची सुरक्षा आणि शहिदांचा सन्मान हेच प्राधान्य असायला हवे, केवळ करमणूक नव्हे, असा मुद्दा मांडण्यात आला होता.

हा तर सामनाच आहे...

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सामना रविवारी असल्याने शुक्रवारीच खटला यादीत घ्यावा, अशी विनंती केली. मात्र, खंडपीठाने सरळ नकार देत सांगितले की, "घाई कसली आहे? हा तर सामनाच आहे. सामना रोखण्याचा आमचा कोणताही विचार नाही.'' तर, वारंवार विनंती करूनही कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला.

सामना ठरल्याप्रमाणेच

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता १४ सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाक सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच खेळला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in