
मुंबई : प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्यालयात निवड समितीची बैठक पार पडणार असून त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर पत्रकारांशी संवाद साधतील, असे समजते.
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दोन गट करण्यात आले आहेत. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारतीय संघ अनुक्रमे २० व २३ फेब्रुवारी रोजी बांगलादेश व पाकिस्तानविरुद्ध साखळी लढत खेळणार आहे. त्यानंतर २ मार्चला भारताची न्यूझीलंडशी गाठ पडेल. संघ निवडीतील महत्त्वाचा मुद्दा हा जसप्रीत बुमराची तंदुरुस्ती हाच असणार आहे.
३१ वर्षीय बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अवघ्या १३.०६च्या सरासरीने तब्बल ३२ बळी मिळवले. बुमराने या मालिकेत १५०हून अधिक षटके गोलंदाजी केली. भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. मात्र बुमराच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सिडनी येथील पाचव्या कसोटीत बुमरा भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र पाठदुखीमुळे दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजीसाठी आला नाही. पहिल्या डावातच गोलंदाजीच्या वेळेस त्याची पाठ दुखू लागल्याने स्टेडियम सोडून तो स्कॅन करण्यासही गेला होता. सध्याच्या माहितीनुसार बुमराची पाठदुखी ग्रेड-२ किंवा ग्रेड-३ स्वरूपातील असल्याचे समजते. त्यामुळे तो थेट फेब्रुवारीच्या अखेरीस खेळण्यासाठी उपलब्ध असू शकतो. या स्थितीत बुमराचा संघात समावेश करण्यात येणार की नाही, याविषयी चर्चा रंगत आहे.
दरम्यान, २२ जानेवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून ३ लढतींची एकदिवसीय मालिका सुरू होईल. एकदिवसीय मालिकेसाठीही शनिवारीच संघ जाहीर करण्यात येईल. यानंतर रोहित व आगरकर पत्रकारांशी संवाद साधतील. मोहम्मद शमीचे पुनरागमन, यशस्वी जैस्वालला संधी तसेच रोहित, विराट या अनुभवी खेळाडूंचा सध्याचा फॉर्म यांसारख्या अनेक मुद्द्यांवर निवड समितीला विचार करावा लागेल.
बुमराची सद्यस्थिती
बुमराची पाठदुखी ग्रेड-२ ते ग्रेड-३ स्वरूपातील आहे. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी किमान आणखी एक ते दीड महिना जाऊ शकतो.
बुमराच्या पाठीला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र पाठीचे स्नायू ताणले गेल्यामुळे तसेच सातत्याने सूज येत असल्याने तो गोलंदाजी करू शकत नाही.
एनसीएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमरा तंदुरुस्त झाल्यावर किमान १-२ सामन्याद्वारे त्याची चाचणी घेऊनच त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची मुभा देण्यात येईल. या सर्व घडामोडींसाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.