
लीड्स : भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या अध्यायाची सुरुवात पराभवाने झाली. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्व पर्वातील पहिल्याच कसोटीत भारताच्या पदरी निराशा पडली. गोलंदाजांची सुमार कामगिरी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका बसला. त्यामुळे यजमान इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताचा ५ गडी राखून पराभव केला. पाचव्या दिवसातील अखेरच्या सत्रापर्यंत रंगलेल्या या लढतीत अखेर ८२व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर जेमी स्मिथने रवींद्र जडेजाला विजयी षटकार लगावला.
हेडिंग्ले येथील स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत भारताने चौथ्या डावात इंग्लंडपुढे विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र बेन डकेटचे (१७० चेंडूंत १४९ धावा) झंझावाती शतक आणि जो रूट (८४ चेंडूंत नाबाद ५३ धावा), झॅक क्रॉली (१२६ चेंडूंत ६५ धावा) यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने ८२ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. कर्णधार बेन स्टोक्स (३३) व जेमी स्मिथ (नाबाद ४४) यांनीही अमूल्य योगदान दिले. याबरोबरच इंग्लंडने पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होईल.
लीड्स येथे झालेल्या या कसोटीत पहिल्या डावात भारताने यशस्वी जैस्वाल, गिल व पंतच्या शतकाच्या बळावर ४७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४६५ धावा केल्या. त्यांच्याकडून ओली पोपने शतक झळकावले, तर भारतासाठी तारांकित जसप्रीत बुमराने पाच बळी मिळवले. मग सोमवारी चौथ्या दिवशी भारताने सुरुवातीचे ३ बळी लवकर गमावल्यावर पंतने कसोटीतील आठवे, तर राहुलने कसोटीतील नववे शतक झळकावले. त्यामुळे भारताने इंग्लंडपुढे ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली या तारांकित फलंदाजांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर आता भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये स्थित्यंतराची वेळ आली आहे. २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणूनच या मालिकेची सर्वांना उत्सुकता लागून आहे.
इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच येथे कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौरे केले. मात्र त्यांना यश लाभले नाही. २०२१मध्ये भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यावेळी काही सामन्यांत विराट, तर काही सामन्यात बुमरा भारताचा कर्णधार होता. रोहितच्या नेतृत्वात प्रथमच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आला असता. परंतु त्याने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यामुळे आता गिलला हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.
दरम्यान, सोमवारच्या बिनबाद २१ धावांवरून पुढे खेळताना डकेट व क्रॉली यांनी भारतीय गोलंदाजांना हैराण केले. दोघांनी १८८ धावांची सलामी नोंदवली. भारताने दुसऱ्या डावातही काही झेल सोडले. अखेरीस प्रसिध कृष्णाने क्रॉलीला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर ओली पोपही (८) त्याच्याच गोलंदाजीवर बाद झाला. जकेटने मात्र शतक झळकावून संघाला विजयासमीप नेले. शार्दूल ठाकूरने मग डकेट व हॅरी ब्रूक यांना एकाच षटकात बाद करून रंगत निर्माण केली. तसेच जडेजाने स्टोक्सला बाद केले. परंतु रूटने नाबाद अर्धशतक झळकावून संघाचा विजय साकारला. त्याला स्मिथने सुरेख साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ४७१
इंग्लंड (पहिला डाव) : ४६५
भारत (दुसरा डाव) : ३६४
इंग्लंड (दुसरा डाव) : ८२ षटकांत ५ बाद ३७३ (बेन डकेट १४९, झॅक क्रॉली ६५, जो रूट नाबाद ५३; शार्दूल ठाकूर २/५१)