Women's Cricket World Cup 2025 : महिलांकडूनही पाकिस्तानचा धुव्वा

२२ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौडने (२० धावांत ३ बळी) केलेल्या भेदक माऱ्याला फिरकीपटूंची योग्य साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा ८८ धावांनी धुव्वा उडवला. भारताने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना गुणतालिकेत अग्रस्थान काबिज केले.
Women's Cricket World Cup 2025 : महिलांकडूनही पाकिस्तानचा धुव्वा
Photo : Instagram (wmplt20tournament)
Published on

कोलंबो : २२ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौडने (२० धावांत ३ बळी) केलेल्या भेदक माऱ्याला फिरकीपटूंची योग्य साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा ८८ धावांनी धुव्वा उडवला. भारताने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना गुणतालिकेत अग्रस्थान काबिज केले.

कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताने दिलेल्या २४८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४३ षटकांत १५९ धावांत गारद झाला. सिदरा अमीनने ८१ धावांची झुंज दिली. क्रांतीला दीप्ती शर्माने ३, तर स्नेह राणाने २ बळी घेत उत्तम साथ दिली. याबरोबरच भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व अबाधित राखले. भारतीय महिला संघाने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध कधीच एकदिवसीय सामना गमावलेला नाही. त्यांनी पाकिस्तानला १२ एकदिवसीय लढतींमध्ये नमवले आहे. क्रांती सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. आता ९ ऑक्टोबरला भारताची दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल.

भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगणार असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत होतील. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत होतील. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यापैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. यावेळी महिला संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे.

दरम्यान, पहिल्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने श्रीलंकेला नमवले. रविवारी प्रथम फलंदाजी करताना मात्र अनेक फलंदाजांना चांगली सुरुवात मिळूनही अर्धशतक साकारता आले नाही. प्रतिका रावल (३१) व स्मृती मानधना (२३) यांनी ४८ धावांची सलामी दिली. स्मृती बाद झाल्यावर भारताची धावगती हळूहळू मंदावली. हरमनप्रीत (१९), दीप्ती शर्मा (२५) यांनी निराशा केली. हरलीन देओलने ६५ चेंडूंत ४६ धावा केल्या, तर मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने ३७ चेंडूंत ३२ धावांचे योगदान दिले. तरीही भारतीय संघ एकवेळ ७ बाद २०३ अशा स्थितीत होता. रिचा घोषने २० चेंडूंत नाबाद ३५ धावा फटकावून भारताला किमान २४७ धावांपर्यंत नेले. वेगवान गोलंदाज डायना बैगने चार बळी मिळवले. भारताचा डाव बरोबर ५० षटकांत २४७ धावांत आटोपला.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी सुरुवातीपासूनच संथगतीने सुरू होती. १५ षटकांत त्यांच्या फक्त ४० धावा फलकावर होत्या. क्रांतीने सदाफ शमा (६), आलिया रियाझ (२) व नतालिया परवेझ (३३) यांचे बळी मिळवले. दीप्ती व राणा यांच्या फिरकी जोडीने मग मधल्या फळीला गुंडाळले. सिदराने ९ चौकार व १ षटकारांसह ८१ धावा केल्या. मात्र ४३ षटकांत पाकिस्तानचा संघ १५९ धावांत गारद झाला. पाकिस्तानचा हा विश्वचषकातील सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे त्यांना कामगिरी सुधारावी लागणार आहे.

भारताने सलग चौथ्या रविवारी पाकिस्तानला क्रिकेटमध्ये धूळ चारली. सप्टेंबरमध्ये १४, २१ व २८ तारखेच्या रविवारी पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला नमवले, तर यावेळी (५ ऑक्टोबर) महिलांनी पाकिस्तानला नेस्तनाबूत केले.

भारतीय महिलांनी पाकिस्तानविरुद्ध सलग १२वा एकदिवसीय सामना जिंकला.

logo
marathi.freepressjournal.in