भारताकडून पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात खेळणारी अंतिम पांघल हिचे आव्हान बुधवारी झालेल्या पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. अंतिमचा ५३ किलो वजनी गटामध्ये तुर्कीच्या येतगिल झेयनेप हिने ०-१० ने पराभव केला. त्यामुळे आता अंतिम पांघल हिची रिपिचेज फेरीद्वारे कांस्यपदकासाठीच्या लढतीत खेळण्याची आशाही संपुष्टात आली आहे. पराभूत झाल्यावर अंतिम आणि तिच्या सपोर्ट स्टाफला पॅरिस तात्काळ सोडावं लागल्याची माहिती समोर येत आहे.
अंतिम पांघल ही तीच महिला पैलवान आणि जिच्यामुळे विनेश फोगाट हिला ५० किलो वजनी गटात खेळावे लागले. बुधवारी महिलांच्या ५३ किलो वजनी गटाची पहिली फेरी ही बुधवारी पार पडली. यात तिचा सामना हा तुर्कीच्या येतगिल झेयनेप हिच्याशी झाला. पहिल्याच फेरीत अंतिमला १०१ सेकंदातच पराभूत व्हावे लागले. तुर्कीची खेळाडू तिच्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याने काही सेकंदातच तिने १० गुण वसूल केले. झेयनेप हिने अंतिमवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत दोन गुण वसूल केले. त्यानंतर पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर अंतिम पांघल हिला दोन वेळा उलटे फिरवल्यानंतर तिने चार गुण मिळवले. पुन्हा एकदा दोन गुण मिळवल्यानंतर रेफ्रींनी ही बाऊट थांबवत झेयनेप हिला विजयी घोषित केले. त्यामुळे अंतिमला पॅरिस ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाती परतावं लागणार आहे.
पराभूत होताच अंतिमला का सोडावं लागलं पॅरिस?
नियमाचे उल्लंघन केल्याने इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने अंतिमचा सामना झाल्यावर तिला आणि तिच्या सपोर्ट स्टाफला तात्काळ पॅरिसमधून बाहेर नेले. अंतिमने अनधिकृतपणे तिच्या बहिणीला ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये येण्यासाठी ऍक्रिडिशन कार्ड दिले होते. यामुळे ऍक्रिडिशन कार्डचा चुकीचा उपयोग करण्यात आला. ऍक्रिडिशन कार्ड घेऊन ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये घुसणाऱ्या अंतिमच्या बहिणीला फ्रेंच पोलिसांनी पकडले. यावेळी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. मग IOA ने मध्यस्थी केल्यावर अंतिमच्या बहिणीला सोडण्यात आले. मात्र फ्रेंच अधिकाऱ्यांनी IOA कडे उल्लंघनाची तक्रार नोंदवली त्यामुळे अंतिम स्पर्धेत पराभूत झाल्यावर तात्काळ तिला आणि तिच्या सपोर्ट स्टाफला पॅरिसमधून बाहेर पाठवण्यात आले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतला नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा :
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात केवळ ३ कांस्य पदकांचा समावेश. बुधवार ७ ऑगस्ट रोजी पैलवान विनेश फोगाटकडून भारताला पदकाची अपेक्षा होती, मात्र अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे विनेशला रिकाम्या हाती भारतात परतावं लागणार आहे. तर भालाफेकपटू नीरज चोप्राकडून भारताला गुरुवारी सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.