पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातील अंतिम फेरीत स्थान मिळवलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला बुधवारी सकाळी ओव्हरवेटमुळे अपात्र घोषित करण्यात आले. संपूर्ण भारताला विनेशकडून पदकाची अपेक्षा होती मात्र केवळ १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आलं. विनेश सोबत घडलेल्या या घटनेनंतर तिला धीर देण्यासाठी संपूर्ण भारत एकवटलेला दिसतोय. अनेक दिग्गज खेळाडू, नेते, कलाकारमंडळींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विनेशला पाठिंबा दिला. फक्त भारतच नाही तर विनेशला अपात्र ठरवल्यानंतर इतर अनेक देश सुद्धा तिला पाठिंबा देताना दिसतायत.
अमेरिका, ग्रीस, नायजेरिया, तुर्कस्थान इत्यादी देशातील खेळाडू आणि कोचकडून विनेशला जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. केवळ १०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेशला अंतिम फेरीपूर्वी बाद करण्यात आले, याप्रकरणाची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. नायजेरियन महिला कोच प्युरिटी अकुह यांनी म्हंटले की, "असं काही घडताना पहिल्यांदाच पाहिलं आहे. विनेशसाठी मला खूप वाईट वाटतंय. तिने एक रेकॉर्ड मोडला आहे त्यामुळे ती अंतिम फेरीच्या पोडियमवर येण्यास पात्र आहे".
अमेरिकेचा कुस्तीपटू जॉर्डन बुरोज याने म्हंटले की, "विनेशला रौप्य पदक द्यायला हवं. तसेच मंगळवारी उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीत विनेशने वजन मर्यादा पाळली होती आणि या सामन्यात तिने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवून अंतिम फेरीत धडक सुद्धा दिली. तेव्हा दुसऱ्या दिवशी वजनासंबंधित कडक नियम बदलायला पाहिजे". तर तुर्कस्थानने विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या निर्णयावर दुःख व्यक्त केलंय.
जागतिक कुस्तीचे प्रमुख काय म्हणाले?
जागतिक कुस्ती प्रमुख नेनाद लालोविच यांना विनेशच्या अपात्रतेबाबत विचारणा केली असता त्यांनी म्हंटले, "विनेश फोगाटवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली त्याबाबत मी खूप दुःखी आहे. मी तिची निराशा समजू शकतो पण जर तुम्ही १०० ग्रॅम जास्त वजन असताना खेळण्याची सूट दिली तर तुम्हाला पुढे २०० ग्रॅम वजन जास्त असल्यास सुद्धा खेळायची परवानगी द्यावी लागेल, मग याला अंत नाही".
मंगळवारी उपांत्य आणि उपांत्य पूर्व फेरीत विनेशचं वजन हे बरोबर ५० किलो इतकं भरलं होत. यावेळी तिने महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातील अनेक दिग्गज कुस्तीपटूंना धूळ चारली तेव्हा विनेशला रौप्य पदक देण्यात यावं असं मत काहींनी व्यक्त केलं होतं. यावर नेनाद लालोविच म्हंटले, "असं करणं अशक्य आहे. कारण सर्व काही बदलतंय. आणि काहीही झालं तरी नियम हे नियम असतात."
हरियाणा सरकारकडून बक्षिसाची घोषणा :
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विनेश भारतात आल्यावर तिचा एका ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडू प्रमाणेच सन्मान केला जाईल. त्यांनी म्हंटले की हरियाणा सरकारकडून ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्याला जो सन्मान आणि बक्षिस दिले जाते ते विनेश फोगाटला दिले जाईल.
विनेश फोगाटची कुस्तीतून निवृत्ती :
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी केवळ काही ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर आता भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिने गुरुवारी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विनेश फोगटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पहाटे एक पोस्ट करत ही घोषणा केली. " आई, कुस्ती माझ्याशी जिंकली पण मी हरले, माफ कर...तुझे स्वप्न...माझे धैर्य...सर्व तुटले...माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व...," अशी भावूक पोस्ट करीत तिने कुस्तीला अलविदा केल्याचे जाहीर केले.