Paris Olympics 2024: नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांसाठी तसेच देशवासीयांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे विनेशसोबत घातपात झाला, असा संशय व्यक्त केला जात असतानाच, तिचे सासरे राजपाल राठी यांनी केंद्र सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघानेच कटकारस्थान रचल्याचा आरोप केला आहे.
“विनेशने ऑलिम्पिकपूर्वीच तिच्याविरोधात षडयंत्र रचले जाईल, असे सूतोवाच केले होते. तिच्या विरोधातील अपात्रतेचा निर्णय हा पूर्णपणे कटाचा भाग आहे आणि यामध्ये मोदी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचा भाग आहे. विनेशचे वजन वाढवण्यामागे तिचे कोच आणि सपोर्ट स्टाफचा हात आहे,” असा आरोप तिचे सासरे राजपाल राठी यांनी केला आहे.
सपोर्ट स्टाफने विनेशला दिशाभूल केल्यामुळे तिच्या विरोधात मोठा निर्णय घेतला गेला आहे. विनेशने भाजप नेते बृजभूषण सिंहविरोधात आवाज उठवला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे. फेडरेशन आणि सरकार पूर्णपणे या कटामध्ये सामील आहेत, असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्याकडून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याप्रकरणी गेल्या वर्षी देशातील अव्वल क्रीडापटूंनी याविरोधात आवाज उठवला होता. त्यात विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह देशातील दिग्गज कुस्तीपटू सामील होते. दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक महिने आंदोलनाला बसलेल्या या कुस्तीपटूंची दखल केंद्र सरकारने घेतली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या कारभाराविषयी खेळाडूंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ‘मोदी मैं तेरी कब्र खोदूंगी’ अशा शब्दांत विनेश फोगटने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. आता तिच्याबाबतीत घात झाल्यामुळे तिच्या जवळच्या कुटुंबियांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतीय कुस्ती महासंघावर कटकारस्थान रचल्याचे आरोप केले आहेत.