पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातील अंतिम फेरीत स्थान मिळालेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला बुधवारी सकाळी ओव्हरवेटमुळे अपात्र घोषित करण्यात आले. संपूर्ण भारताला विनेशकडून पदकाची अपेक्षा होती मात्र केवळ १०० ते १५० ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आलं. विनेश सोबत घडलेल्या या घटनेवर भारतीय क्रीडा विश्वातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. "तुझ्यासोबत जे घडलं त्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे...यामागे काही काळंबेरं आहे...याची सखोल चौकशी व्हायला हवी", अशा अनेक प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस सोशल मीडियावर पडत असून विनेशवर अन्याय झाल्याचा एकूणच सूर दिसून येत आहे.
मंगळवारी महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने पहिल्याच फेरीत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती तसेज जगज्जेती आणि जपानची अग्रमानांकित युई सुसाकीला धूळ चारली होती. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही विनेशने धडाकेबाज विजयाची नोंद करताना थाटात अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे बुधवारी भारताच्या खात्यात विनेशमुळे अजून एका पदकाची भर पडणार हे निश्चित समजलं जात होतं. मात्र बुधवारी सकाळी अंतिम फेरीपूर्वी करण्यात आलेल्या वजनात विनेशचं वजन हे १०० ते १५० ग्रॅम जास्त असल्याचं आढळलं. त्यामुळे समितीने विनेशला अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवले.
विनेशच्या अपात्रतेबाबतचा निर्णय आल्यावर पंतप्रधान मोदी यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केली. त्यांनी लिहिले, "विनेश, तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयाची प्रेरणा आहेत. आज आलेल्या निर्णयामुळे दुःख झालं, माझी इच्छा आहे की मी अनुभवत असलेली निराशेची भावना शब्दांनी व्यक्त करावी. मला माहित आहे की तुम्ही लवचिकतेचे प्रतीक आहात. आव्हाने स्वीकारणे हा तुमचा नेहमीचा स्वभाव राहिला आहे. मजबुतीने पुन्हा कमबॅक करा".
तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी सुद्धा पोस्ट करून विनेशला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यांनी लिहिले, "विश्वविजेत्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची शान विनेश फोगटला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले, हे दुर्दैवी आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हिम्मत हरणारी नाही, ती आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल असा आम्हाला विश्वास आहे. विनेश तू नेहमीच देशाचा अभिमान वाढवला आहेस. आजही संपूर्ण देश पूर्ण ताकदीने तुझ्या पाठीशी उभा आहे".
भारताची महिला पैलवान साक्षी मलिक, पैलवान बजरंग पुनिया आणि बॉक्सर विजेंद्र सिंह यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून विनेशला न्याय मिळावा अशी मागणी करत तिला धीर दिला आहे. बॉक्सर विजेंद्र सिंहने माध्यमांशी बोलताना, ऑलिम्पिकमध्ये भारताविरुद्ध कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला.
सिनेसृष्टीतून सुद्धा विनेश फोगाट सोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट केल्या. ज्यात अभिनेत्री स्वरा भास्कर, रितेश देशमुख इत्यादींचा समावेश आहे.