सट्टेबाजी फुलफॉर्मात; आयपीएलवर रोज ६०० कोटींची बेटिंग

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ, हैद्राबाद शहरांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई व कराचीत या सामन्यांवर सट्टा खेळला जाणार
सट्टेबाजी फुलफॉर्मात; आयपीएलवर रोज ६०० कोटींची बेटिंग

येत्या ३१ मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असतानाच यावेळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांवर सट्टेबाजीसाठी क्रिकेट बुकी व मॅच फिक्सर यांनी रोज ६०० कोटींचा सट्टा खेळण्याची तयारी केली आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ, हैद्राबाद शहरांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई व कराचीत या सामन्यांवर सट्टा खेळला जाणार आहे. क्रिकेट बुकींबाबत मुंबई पोलिसांच्या अहवालाची ‘नवशक्ति’ला माहिती मिळाली आहे.

सट्टेबाजीला बंदी असल्याने बुकींनी बेटिंगसाठी कोड नंबर देणे सुरू केले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ६० बुकी व १८ क्रिकेट बेटिंग ॲॅपचे नेटवर्कवर लक्ष ठेवले आहे. अनेक पंटर्स या आयपीएलच्या सामन्यांवर बेटिंग घेत असतात. टी-२० जागतिक वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात बेटिंग घेणारे ऑनलाईन रॅकेट मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गेल्या नोव्हेंबरमध्ये उद‌्ध्वस केले होते. त्यावेळी बुकी ॲॅन्थोनी डायस, इम्रान खान, धर्मेश शिवदासानी, धर्मेश व्होरा, गौरव शिवदासानी यांना अटक केली होती. क्रिकेट बुकीज अनेक मार्गाने क्रिकेटवर सट्टेबाजी करत असतात. त्यात सामना कोण जिंकणार किंवा हरणार, सर्वोच्च धावा, चौकार, बळी, प्रत्येक आयपीएल सामन्यातील चांगली कामगिरी करणारा खेळाडू आदींवर बेटिंग घेतली जाते. सट्टेबाजीचे दर पाकिस्तान ते दुबई आणि पुढे भारत आणि इतर बाजारपेठांमध्ये ठरवले जातात. त्यानंतर ‘डी’ कंपनीकडून क्रिकेट सट्टेबाजी सिंडिकेटमधील विविध भागधारकांना त्यांच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी धमकावले जाते.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, यंदा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये फेब्रुवारीत भारत व ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात चार बुकींना अटक केली होती. ही कारवाई नागपूर पोलिसांनी केली होती.

हे बुकी महत्त्वाच्या ठिकाणी बसून क्रिकेट सामन्यातील घडामोडींची माहिती पंटर्सना देत होते. क्रिकेट बेटिंग केवळ सामन्यांच्या जय-पराजयवर लागत नाहीत, तर प्रत्येक चेंडूगणिक लागत असतात. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणी सामना सुरू आहे तेथील बुकी प्रत्येक चेंडूवर किती धावा होतील यावर बेटिंग लावतात आणि टीव्हीवर सहा सेकंदांच्या जाहिरात प्रसारणाचा फायदा घेतात. नागपूर आणि मोहाली क्रिकेट स्टेडियमवर अनेक बुकींना अटक झाली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने दिली. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या महिन्यात १४१४ कोटींचे क्रिकेट बेटिंग उध्वस्त केले होते. या बेटिंगचे धागेदोरे राजकोट येथील बुकी राकेश राजदेवपर्यंत पोहचले. हे बुकी क्रिकेट बेटिंगच्या निधीसाठी गरीब कामगारांचे ११ क्रमांकाचे बँक अकाऊंट किंवा निवृत्त पेन्शनर्स खाती वापरतात.

महाराष्ट्राच्या बजेटपेक्षा आयपीएल बेटिंगची उलाढाल अधिक

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा आयपीएल क्रिकेट बेटिंग अधिक आहे. २०२३ च्या प्रत्येक सामन्यात ३५०० कोटी रुपयांचा सट्टा लागणार आहे. यंदा १६ वी आयपीएल असून, त्यात ७४ सामने होणार आहेत. त्यात १० संघ खेळणार आहेत. प्रत्येक संघ १४ लीग सामने खेळेल. त्यातून एवढ्या सामन्यावर किती सट्टा लागेल याचा अंदाज येऊ शकतो. २.५ ते ३ लाख कोटींपर्यंत हा आकडा असण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in