SRH vs CSK : तळाचे स्थान टाळण्यासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये चुरस; चेपॉकवर आज धोनी खेळणार ४००वा टी-२० सामना

आयपीएलमध्ये शुक्रवारी रंगणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे गुणतालिकेत तळाशी असलेले दोन संघ आमनेसामने येतील.
SRH vs CSK : तळाचे स्थान टाळण्यासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये चुरस; चेपॉकवर आज धोनी खेळणार ४००वा टी-२० सामना
Published on

चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी रंगणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे गुणतालिकेत तळाशी असलेले दोन संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध आपापली अखेरची लढत गमावली असून हैदराबादचा संघ गुणतालिकेत नवव्या, तर चेन्नई १०व्या स्थानी आहे. दोघांनाही ८ पैकी फक्त २ लढती जिंकता आल्या आहेत. त्यामुळे आता उर्वरित ६ सामन्यांत पलटवार करण्यासाठी चेन्नई-हैदराबाद उत्सुक असतील.

चेपॉकच्या मैदानात होणारी ही लढत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टी-२० कारकीर्दीतील ४००वा सामना असेल. धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने हंगामातील पहिल्या लढतीत मुंबईला धूळ चारली. मग चेन्नईला सलग पाच पराभव पत्करावे लागले. लखनऊला नमवून त्यांनी पुन्हा लय गवसण्याचे संकेत दिले. मात्र मुंबईविरुद्ध वानखेडेवर चेन्नईचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चेन्नईला सर्व सामने जिंकण्यासह अन्य निकालांवरही अवलंबून रहावे लागणार आहे.

चेन्नईकडून वानखेडेवर पदार्पण करणारा १७ वर्षीय मुंबईकर आयुष म्हात्रे, मुंबईचाच शिवम दुबे व रचिन रवींद्र यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीत मात्र चेन्नईला फिरकीपटूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. तसेच मथीशा पाथिरानाने यंदा लौकिकाला साजेसा खेळ केलेला नाही. खलिल अहमद दमदार वेगवान मारा करत आहे. अंशुल कंबोजला चेन्नईचा संघ संधी देऊ शकतो.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादनेसुद्धा गेल्या लढतीत मुंबईकडून दारुण पराभव पत्करला. ८ सामन्यांतील सहा पराभवांसह हा संघ यंदा साखळीतच गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असलेल्या हैदराबादला कामगिरी उंचवावी लागणार आहे. चेन्नईच्या नूर अहमद, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन या फिरकी त्रिकुटाविरुद्ध हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा व हेनरिच क्लासेन या फलंदाजांचा कस लागेल. हैदराबादने चेन्नईला चेपॉक येथे एकदाही नमवलेले नाही, त्यामुळे त्यांना यंदा इतिहास रचण्याची संधी आहे.

एकूणच पराभूत होणारा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडेल, तर जिंकणाऱ्या संघाला आणखी एक उमेद मिळेल. त्यामुळे ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असेल.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पटेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर, रविचंद्रन स्मरण, जयदेव उनाडकट.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in