RR vs CSK, IPL 2026 : सॅमसन, जडेजावर सर्वांच्या नजरा; राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज लढत

गेली अनेक वर्षे राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केल्यानंतर भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे.
RR vs CSK, IPL 2026 : सॅमसन, जडेजावर सर्वांच्या नजरा; राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज लढत
RR vs CSK, IPL 2026 : सॅमसन, जडेजावर सर्वांच्या नजरा; राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज लढत(Photo-@cricketnmore)
Published on

गुवाहाटी : गेली अनेक वर्षे राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केल्यानंतर भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. त्यामुळे सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने भिडणार असून सॅमसनसाठी हा सामना भावनात्मक असणार आहे.

रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्स हे समीकरण बनले होते. मात्र जडेजा आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणार असल्यामुळे त्याच्यासाठीही हा सामना जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. गेल्या दशकभरापासून संजू सॅमसन हा राजस्थानच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ होता. २०२२च्या अंतिम फेरीत राजस्थानला पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या संजू सॅमसनने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करणारा सॅमसन सध्या तुफान फॉर्मात आहे. वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा सॅमसन वर्ल्डकपमधील स्टार खेळाडू ठरला. आता चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यासह तो सलामीला उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे किमान दोन आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत २० वर्षीय डावखुरा फिरकीपटू प्रशांत वीर याला संधी मिळण्याची शक्यता आहे. डेवाल्ड ब्रेविसची परिपक्वता, शिवम दुबे हा मधल्या फळीतील प्रमुख आधारस्तंभ ठरलेला असतानाच युवा आकाश म्हात्रे यांच्या समावेशामुळे चेन्नईची बाजू वरचढ मानली जात आहे.

राजस्थान रॉयल्स संघातून संजू सॅमसन निघून गेल्यामुळे आता त्यांची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानची चेन्नईविरुद्ध खरी परीक्षा असणार आहे. रवींद्र जडेजाच्या समावेशामुळे राजस्थानचा संघ काहीसा समतोल झाला असून सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्या खांद्यावर

मोठी जबाबदारी असणार आहे. युवा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी तसेच फॉर्मात असलेला शिमरॉन हेटमायर यांच्याकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा राजस्थानला असेल.

राजस्थानला गोलंदाजीची चिंता

गेल्या मोसमात राजस्थानला नवव्या तर चेन्नईला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी २०२६च्या मोसमातील पहिलाच सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. राजस्थानला या सामन्यात गोलंदाजीची चिंता सतावत आहे. जोफ्रा आर्चरच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे राजस्थानची पुरती दैना झाली होती. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ही जडेजा आणि रवी बिश्णोई यांच्या खांद्यावरच असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा डेवाल्ड ब्रेविस हासुद्धा आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे पहिल्या दोन ते तीन सामन्यांत तो खेळू शकणार नाही. गेल्या वर्षी २.२० कोटी रुपयांना विकत घेतलेल्या ब्रेविसला त्याच किंमतीला चेन्नईत कायम ठेवण्यात आले आहे.

  • राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये ३१ सामने झाले असून त्यात चेन्नईने १६, तर राजस्थानने १६ सामन्यांत विजय मिळवला आहे.

  • राजस्थानचा कर्णधार रियान पराग याला आयपीएलमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी फक्त २ बळींची आवश्यकता आहे. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये षटकारांचे द्विशतक पार करण्यासाठी त्याला १२ षटकारांची गरज आहे.

  • रवींद्र जडेजा याला टी-२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १५ धावांची आवश्यकता असून राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये ५०० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी ७० धावांची गरज आहे.

खेळपट्टीचा अंदाज

गुवाहाटीच्या बर्सपारा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी ही प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी अनुकूल मानली जात आहे. रात्रीच्या सुमारास दव पडल्यानंतर या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड जाणार आहे. पहिल्या डावात सरासरी १५० ते १६० धावा होण्याची शक्यता आहे. गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी केल्यास त्यांना यश मिळू शकते.

प्रतिस्पर्धी संघ

  • चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, खलिल अहमद, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स.

  • राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुनिया, युधवीर सिंग.

  • सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

logo
marathi.freepressjournal.in