माजी विजेत्यांचा अनोखा जल्लोष! १९व्या हंगामापूर्वी मुंबईचा चाहत्यांसाठी विशेष सोहळा, चेन्नईकडून आठवणींना उजाळा

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघा चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानिमित्ताने यंदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या पाच वेळच्या माजी विजेत्या संघांनी यावेळी अनोख्या शैलीत उत्सव साजरा केला.
माजी विजेत्यांचा अनोखा जल्लोष! १९व्या हंगामापूर्वी मुंबईचा चाहत्यांसाठी विशेष सोहळा, चेन्नईकडून आठवणींना उजाळा
माजी विजेत्यांचा अनोखा जल्लोष! १९व्या हंगामापूर्वी मुंबईचा चाहत्यांसाठी विशेष सोहळा, चेन्नईकडून आठवणींना उजाळा
Published on

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघा चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानिमित्ताने यंदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या पाच वेळच्या माजी विजेत्या संघांनी यावेळी अनोख्या शैलीत उत्सव साजरा केला.

हंगामापूर्वी साधारण पत्रकार परिषद घेण्यापेक्षा यावेळी मुंबईने चाहत्यांसाठी बीकेसी येथे दोन दिवस ‘एम आय मिक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन केले, तर चेन्नईने चेपॉक स्टेडियमवर माजी विजेत्या खेळाडूंना आमंत्रित करून आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे या दोन्ही संघांच्या जल्लोषाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मुंबईच्या सोहळ्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते. यावेळी चाहत्यांना मोफत गिफ्टही वाटण्यात आले. दुसरीकडे चेन्नईने सुरेश रैना, अंबाती रायुडू, मॅथ्यू हेडन, माईक हसी यांसारख्या चेन्नईच्या माजी खेळाडूंना आमंत्रित करून पाच चषकांसह छायाचित्र काढले

काही आठवड्यांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.

आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. तूर्तास १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

आयपीएलनंतर भारताची पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिका येथे रंगणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी सुरू होईल. शुभमन गिल भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार असून अन्य १९ खेळाडू कोण असतील, याची चाहत्यांनाही पुसटशी कल्पना आहे. मात्र निवड समिती या खेळाडूंच्या कामगिरीवर आयपीएलमध्ये लक्ष ठेवून असेल. निवड समितीचे अध्यक्ष मुंबईकर अजित आगरकर भूषवत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत शिवसुंदर दास, प्रग्यान ओझा, रुद्रप्रताप सिंग व अजय रत्रा हे अन्य चार विभागातील सदस्य होते. आगरकर हे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतात.

रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही तारांकित खेळाडू एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यास आतुर आहेत. मात्र वाढते वय व स्पर्धा यामुळे दोघांनाही युवा खेळाडूंकडून कडवी टक्कर मिळत आहे. रोहित-विराट यांनी गेल्या २-३ एकदिवसीय मालिकांमध्ये सातत्याने छाप पाडली आहे. तसेच के. एल. राहुल, जसप्रीत बुमरा यांच्यावर लक्ष असेल. बुमरा २०२३च्या विश्वचषकानंतर आजवर एकही एकदिवसीय लढत खेळलेला नाही. हार्दिक पंड्याचेही एकदिवसीय संघात पुनरागमन अपेक्षित आहे.

एकदिवसीय संघात सध्या स्थान नसलेले खेळाडू म्हणजेच संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज यांच्यासाठी ही आयपीएल महत्त्वाची ठरेल. मोहम्मद शमी, युझवेंद्र चहलही निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी आतुर असतील. यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋषभ पंत यांनाही एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करावी लागेल.

दरम्यान, आयपीएलचा विचार करता यावेळी मुंबई आणि चेन्नई जेतेपद मिळवण्यासाठी आतुर असतील. दोन्ही संघांना गेल्या काही हंगामांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यावेळी जेतेपदाचा षटकार कोण लगावणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. २८ मार्चची सर्वांना उत्सुकता आहे.

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १९वा हंगाम आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी, अफलातून झेल आणि सामन्याला कलाटणी देणाऱ्या भन्नाट स्पेलद्वारे सर्व खेळाडू चाहत्यांचे पुढील दोन महिने मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या रणधुमाळीत यंदाही १० संघ सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने आजच्या सदरात ‘नवशक्ति’च्या वाचकांसाठी सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांचा घेतलेला हा धावता आढावा.

यंदा जेतेपदाचा षटकार लगावणार?

मुंबई इंडियन्स

  • कर्णधार : हार्दिक पंड्या

  • सर्वोत्तम कामगिरी: विजेतेपद (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून नावलौैकिक मिळवलेल्या मुंबई इंडियन्सला यंदा जेतेपदाचा षटकार लगावण्याची उत्तम संधी आहे. कारण भारताने नुकताच जिंकलेल्या टी-२० विश्वचषकातील चार सदस्य मुंबईच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय रोहित शर्माचा अनुभव आहेच. मुंबईला गेल्या पाच वर्षांत एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे यावेळी ते ही कसर भरून काढण्यास आतुर असतील. वानखेडे स्टेडियमवर २९ मार्च रोजी मुंबईचा संघ कोलकाताविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. गतवर्षी मुंबईचा संघ क्वालिफायर-२मध्ये पराभूत झाला. यंदा मात्र हा संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात छाप पाडेल, अशी आशा आहे. तारांकित जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांची कामगिरी संघासाठी निर्णायक असेल. त्याशिवाय विल जॅक्स, क्विंटन डीकॉक, ट्रेंट बोल्ट, शर्फेन रुदरफोर्ड असे विदेशी खेळाडू यंदा मुंबईकडे आहेत.

संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, अथर्व अंकोलेकर, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.

गतवैभव पुन्हा मिळवण्याचे ध्येय

चेन्नई सुपर किंग्ज

  • कर्णधार : ऋतुराज गायकवाड

  • सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३)

मुंबईप्रमाणेच चेन्नईच्या नावावरही पाच विजेतेपद जमा आहेत. मात्र गेल्या दोन हंगामांत चेन्नईला बाद फेरीदेखील गाठता आलेली नाही. त्यातच यंदा महेंद्रसिंह धोनीचा अखेरचा हंगाम ठरण्याची शक्यता असल्याने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात हा संघ छाप पाडण्यास आतुर असेल. भारताच्या टी-२० विश्वचषक विजयाचा शिल्पकार ठरलेला संजू सॅमसन यंदा चेन्नईच्या ताफ्यात आहेत. तसेच फलंदाजीत यावेळी चेन्नईची भिस्त प्रामुख्याने युवा खेळाडूंवर असेल. धोनी कोणत्या क्रमांकावर खेळणार व प्रशांत वीर, कार्तिक शर्मा यांचा चेन्नई कसा वापर करणार, याकडे लक्ष असेल. गोलंदाजीत चेन्नईसाठी चिंता असून नॅथन एलिस स्पर्धेबाहेर गेला आहे. शिवम दुबे, आयुष म्हात्रे व सर्फराझ खान या मुंबईकरांवर लक्ष असेल.

संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, जेमी ओव्हर्टन, कार्तिक शर्मा, खलिल अहमद, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, रामकृष्ण घोष, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स.

logo
marathi.freepressjournal.in