विजयी मिरवणूक नाही, आता वेध IPL चे! टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू घरी परतले; २८ मार्चपासून IPL चा १९वा हंगाम

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ऐतिहासिक तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू आता आपापल्या घरी रवाना झाले आहेत. २०२४च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर झालेल्या विजयी मिरवणुकीचे यंदा आयोजन नसेल. यास कारणही योग्य असून आता मात्र चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वेध लागले आहेत.
विजयी मिरवणूक नाही, आता वेध IPL चे! टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू घरी परतले; २८ मार्चपासून IPL चा १९वा हंगाम
विजयी मिरवणूक नाही, आता वेध IPL चे! टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू घरी परतले; २८ मार्चपासून IPL चा १९वा हंगाम
Published on

मुंबई : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ऐतिहासिक तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू आता आपापल्या घरी रवाना झाले आहेत. २०२४च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर झालेल्या विजयी मिरवणुकीचे यंदा आयोजन नसेल. यास कारणही योग्य असून आता मात्र चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वेध लागले आहेत. शनिवार, २८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या हंगामाला प्रारंभ होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८६ हजारांहून अधिक दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने रंगलेल्या टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्याचबरोबर भारताने आयसीसी जेतेपदाची हॅटट्रिक साध्य केली. भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता.

मोदी स्टेडियमवर २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. तसेच या स्पर्धेतील सुपर-आठ सामन्यातही भारत येथेच पराभूत झाला होता. मात्र रविवारी अंतिम सामन्यात हे स्टेडियम भारतासाठी लकी ठरले. मुख्य म्हणजे भारताने न्यूझीलंडला आजवर टी-२० विश्वचषकात एकदाही नमवलेले नव्हते. मात्र यावेळी तीसुद्धा मालिका भारताने खंडित केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केल्यावर अनेक चाहते विजयी मिरवणुकीची प्रतीक्षा करत होते.

२०२४मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी मुंबईतील नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या परिसरात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच बीसीसीआयने १२५ रुपयांचा धनादेश देऊन भारतीय संघाचा गौरवही केला होता. मात्र बीसीसीआयने आता कोणत्याही प्रकारच्या जेतेपदानंतर विजयी मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. यामागे कारण हे चाहत्यांची सुरक्षितता आणि पोलिसांवर येणारा अतिरिक्त ताण आहे.

गतवर्षी म्हणजेच ३ जून, २०२५ रोजी विराट कोहलीचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे पहिलेवहिले जेतेपद मिळवले. १८व्या प‌र्वात बंगळुरूचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला. मात्र पुढील दिवशीच बंगळुरू येथे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला. तसेच अनेक चाहते गंभीर जखमी झाले. त्यामुळेच बीसीसीआयने या स्टेडियमवरही काही काळासाठी बंदी घातली होती. तसेच भारताने कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकली किंवा आयपीएल अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धांचे एखाद्या संघाने विजेतेपद मिळवले, तरी बीसीसीआयने विजयी मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. म्हणूनच सूर्यकुमार, शिवम दुबे हे मुंबईतील खेळाडू मंगळवारी आपापल्या घरी परतले. तसेच अन्य राज्यांतील खेळाडूही त्यांच्या घरी रवाना झाले आहेत.

त्याशिवाय २८ मार्चपासून आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होणार असून एव्हाना बहुतांश संघांचे सराव शिबीर सुरू झाले आहे. त्यामुळेच खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसह वेळ घालवता यावा आणि पुन्हा क्रिकेटकडे वळता यावे, या दृष्टीने हा कालावधी निर्णायक आहे. २० मार्चपर्यंत विश्वचषकातील सर्व भारतीय खेळाडू आपापल्या आयपीएल संघाच्या सराव शिबिरात दाखल होतील, असे समजते.

बंगळुरूचे पाच साखळी सामने चिन्नास्वामीत

रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरूने गतवर्षी आयपीएल जिंकली. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीमुळे यंदा तेथे सामन्यांचे आयोजन करण्यात येईल की नाही, याविषयी साशंका होती. अखेरीस कर्नाटक राज्य शासनाने कर्नाटक क्रीडा मंत्रालयाला चिन्नास्वामी येथे ५ सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. तसेच बंगळुरूचे घरातील अन्य दोन सामने रायपूर येथे होतील.

बीसीसीआयकडून पारितोषिकात भेदभाव

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून तब्बल १३१ कोटींचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने मंगळवारी याबाबत ट्वीट करतानाच भारतीय संघाचे अभिनंदन केले. २०२४च्या टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयने १२५ कोटींचे पारितोषिक दिले होते. यंदा त्यामध्ये ६ कोटींची आणखी वाढ करण्यात आली आहे. खेळाडूंसह संघ व्यवस्थापन व प्रशिक्षकीय फळीतील सदस्यांना मिळून हे १३१ कोटी वाटण्यात येतील. मात्र कोणाला नेमके किती कोटी, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास, सचिव देवाजित सैकिया, सहसचिव प्रभतेज भाटिया आणि सचिव रघुराम भट्ट यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच या सर्वांच्या उपस्थितीत भारतीय संघाला गौरवण्यात येईल. भारताने २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तेव्हा त्यांना ५८ कोटींचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. तसेच २०२५मध्ये भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकला, त्यावेळी त्यांना ५१ कोटी देऊन गौरवण्यात आले. मात्र भारतीय टी-२० संघाला यावेळी तब्बल १३१ कोटींचे पारितोषिक जाहीर करत बीसीसीआयने आपली ताकद दाखवून दिली आहे.

सूर्यकुमारने निवृत्तीच्या अफवांना धुडकावले

भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मंगळवारी मुंबईत परतल्यावर घराबाहेरच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने टी-२० प्रकारातून निवृत्त होण्याच्या अफवांनाही धुडकावले. “मी विश्वचषक जिंकल्यावरच जाहीर केले होते, की पुढील लक्ष्य हे २०२८चा टी-२० विश्वचषक व ऑलिम्पिक सुवर्णपदक असेल. कपिल देव, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा यांसारख्या महान कर्णधारांच्या यादीत माझा समावेश झाला, ही भाग्याची बाब. त्यामुळे आता निवृत्तीचा नाही, तर भारतीय संघाला आणखी शिखरावर घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असे सूर्यकुमार म्हणाला. तसेच भारताने २०२७चा विश्वचषक जिंकावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in