

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १९व्या हंगामाचा थरार शनिवार, २८ मार्चपासून रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तसेच आयपीएल प्रशासकीय समितीने बुधवारी पहिल्या टप्प्यातील २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. भारतातील तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने त्यांच्या तारखा स्पष्ट झाल्यावरच १२ एप्रिलच्या पुढे होणाऱ्या लढतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
विराट कोहलीचा समावेश असलेला आणि रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ रविवार, २९ मार्च रोजी आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्यांची वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडेल. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने बीसीसीआय त्या तारखा स्पष्ट झाल्यावर पुढील वेळापत्रक त्यानुसार जाहीर करणार आहे.
एकूण १६ दिवसांचे वेळापत्रक तूर्तास जाहीर करण्यात आले असून या दरम्यान २० सामने खेळवण्यात येतील. प्रत्येक संघाच्या वाट्याला ४ सामने येतील. यातील दोन सामने हे घरच्या मैदानात, तर अन्य दोन लढती प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात होतील. ४-५ एप्रिल व ११-१२ एप्रिल या शनिवार-रविवारी प्रत्येकी दोन लढती होतील. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेद्वारे असंख्य चाहत्यांचे मनोरंजन होते. तसेच भारताला गुणवान क्रीडापटू गवसतात. रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली असे तारांकित खेळाडू चाहत्यांना २ महिने खेळताना पाहायला मिळतात. त्यामुळेच आता आयपीएलची सर्वांना ओढ लागली आहे. त्यातच भारताने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकल्याने यंदा आयपीएलला अधिक प्रेम लाभू शकते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८६ हजारांहून अधिक दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने रंगलेल्या टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्याचबरोबर भारताने आयसीसी जेतेपदाची हॅटट्रिक साध्य केली. भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता.
२०२४मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी मुंबईतील नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या परिसरात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच बीसीसीआयने १२५ रुपयांचा धनादेश देऊन भारतीय संघाचा गौरवही केला होता. मात्र बीसीसीआयने आता कोणत्याही प्रकारच्या जेतेपदानंतर विजयी मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. यामागे कारण हे चाहत्यांची सुरक्षितता आणि पोलिसांवर येणारा अतिरिक्त ताण आहे.
गतवर्षी म्हणजेच ३ जून, २०२५ रोजी विराट कोहलीचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे पहिलेवहिले जेतेपद मिळवले. १८व्या पर्वात बंगळुरूचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला. मात्र पुढील दिवशीच बंगळुरू येथे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला. तसेच अनेक चाहते गंभीर जखमी झाले. त्यामुळेच बीसीसीआयने भविष्यातील सर्व विजयी मिरवणुकांवर बंदी घातली. तसेच चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीमुळे यंदा तेथे आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यात येईल की नाही, याविषयी साशंका होती. अखेरीस कर्नाटक राज्य शासनाने कर्नाटक क्रीडा मंत्रालयाला चिन्नास्वामी येथे ५ सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. शुक्रवारी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
एव्हाना बहुतांश संघांचे सराव शिबीर सुरू झाले आहे. त्यामुळेच खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसह वेळ घालवता यावा आणि पुन्हा क्रिकेटकडे वळता यावे, या दृष्टीने हा कालावधी निर्णायक आहे. २० मार्चपर्यंत विश्वचषकातील सर्व भारतीय खेळाडू आपापल्या आयपीएल संघाच्या सराव शिबिरात दाखल होतील, असे समजते.
एकूणच आता वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे सगळीकडे आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. तिकीट विक्रीसाठी पुढील काही दिवसांत बीसीसीआयकडून सूचना देण्यात येतील व मग एकच झुंबड उडालेली पाहायला मिळेल.
यंदा स्पर्धेचे स्वरूप कसे?
संपूर्ण वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे यंदा स्पर्धेचे स्वरूप कसे असेल, याबाबत संभ्रम आहे. अनेक जण स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढणार असल्याचे सांगत आहेत.
१० संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली तर प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे. प्रत्येक संघाला आपल्या गटातील अन्य संघांशी प्रत्येकी दोनदा खेळण्याची संधी मिळेल. त्याशिवाय आपल्या समोरील ओळीत असलेल्या संघाशीसुद्धा ते दोन वेळा खेळतील. (उदाहरणार्थ, मुंबई-चेन्नई वेगवेगळ्या गटात असले तरी ते एकमेकांसमोरील ओळीत असल्याने त्यांच्यात दोन लढती होतील.)
प्रत्येक संघ विरोधी गटातील अन्य संघांशी एक लढत खेळणार आहे. गुणतालिका मात्र १० संघांची मिळून एकच असेल.
साखळी फेरीअखेरीस आघाडीचे चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
वानखेडेवर तूर्तास दोन लढती
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्स संघ सध्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन लढती खेळणार आहे. २९ मार्चला वानखेडेवर कोलकाताविरुद्ध सलामीची लढत खेळल्यावर मुंबई संघाला ४ एप्रिल रोजी दिल्लीविरुद्ध दिल्ली येथे खेळायचे आहे. मग ७ तारखेला गुवाहाटी येथे राजस्थान व मुंबई आमनेसामने येतील. रविवार, १२ एप्रिल रोजी मात्र वानखेडेवर चाहत्यांना मुंबई-बंगळुरू लढतीचा थरार पाहायला मिळेल. त्यामुळेच मुंबईच्या दोन वानखेडेवरील लढतींसाठी तिकिटांचा दर दुप्पटीने वाढलेला पाहायला मिळू शकतो. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार दरवर्षी प्रत्येक संघाला आपल्या घरात ७ सामने खेळण्याची संधी लाभते. त्यामुळे वानखेडेवर उर्वरित वेळापत्रकात आणखी कोणते संघ खेळणार, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबई-चेन्नई लढतही वानखेडेवर अपेक्षित आहे.
आयपीएल २०२६ च्या वेळापत्रकानुसार २८ मार्च रोजी बेंगळुरू येथे बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामना संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाणार आहे. २९ मार्चला मुंबईत मुंबई विरुद्ध कोलकाता सामना होईल. ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान विरुद्ध चेन्नई सामना होणार असून ३१ मार्चला मुल्लानपूर येथे पंजाब विरुद्ध गुजरात सामना रंगणार आहे.
१ एप्रिलला लखनऊ येथे लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना होईल, तर २ एप्रिलला कोलकाता येथे कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामना खेळवला जाईल. ३ एप्रिलला चेन्नई येथे चेन्नई विरुद्ध पंजाब सामना होणार आहे. ४ एप्रिलला दिल्ली येथे दिल्ली विरुद्ध मुंबई सामना दुपारी ३.३० वाजता खेळवला जाईल, तर त्याच दिवशी अहमदाबाद येथे गुजरात विरुद्ध राजस्थान सामना संध्याकाळी ७.३० वाजता होईल.
५ एप्रिलला हैदराबाद येथे हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामना दुपारी ३.३० वाजता होईल आणि बेंगळुरू येथे बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सामना संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. ६ एप्रिलला कोलकाता येथे कोलकाता विरुद्ध पंजाब सामना होईल. ७ एप्रिलला गुवाहाटी येथे राजस्थान विरुद्ध मुंबई सामना संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे.
८ एप्रिलला दिल्ली येथे दिल्ली विरुद्ध गुजरात सामना होईल, तर ९ एप्रिलला कोलकाता येथे कोलकाता विरुद्ध लखनऊ सामना खेळवला जाईल. १० एप्रिलला गुवाहाटी येथे राजस्थान विरुद्ध बेंगळुरू सामना होईल. ११ एप्रिलला मुल्लानपूर येथे पंजाब विरुद्ध हैदराबाद सामना दुपारी ३.३० वाजता खेळवला जाईल, तसेच चेन्नई येथे चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना संध्याकाळी ७.३० वाजता होईल.
१२ एप्रिलला लखनऊ येथे लखनऊ विरुद्ध गुजरात सामना दुपारी ३.३० वाजता खेळवला जाईल. त्याच दिवशी मुंबईत मुंबई विरुद्ध बेंगळुरू सामना संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे.