

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ सोमवारी बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हैदराबादला आपल्या फलंदाजीतील सातत्याचा अभाव दूर करत पाच वेळच्या विजेत्या चेन्नईचे आव्हान पार करावे लागणार आहे.
गुणातालिकेत १२ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबादला बाद फेरीतील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. एक सामना गमावल्यास हैदराबादला राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या संघाला शेवटच्या टप्प्यात सांघिक कामगिरी उंचावावी लागेल, कारण गेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला १६८ धावांवर रोखल्यानंतरही हैदराबादचा डाव अवघ्या ८६ धावांत आटोपला होता. त्यापूर्वी पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळाला असला, तरी कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा सात विकेट्सनी पराभव केला होता.
दुसरीकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा पुढील प्रवासही सोपा नाही. चेन्नईला १६ गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा संघ १२ सामन्यांत १२ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. चेन्नईचा नेट रनरेट ०.०२७ असून ते राजस्थान आणि पंजाबपेक्षा मागे आहेत.
अनेक मुख्य खेळाडूंच्या दुखापतींमुळे चेन्नईसमोर अडचणी असल्या, तरी संघात मॅकनील नोरोन्हा आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन, कार्तिक शर्मा आणि उर्विल पटेल यांच्यामुळे चेन्नईची फलंदाजी मजबूत दिसत असली, तरी मागील सामन्यात लखनऊच्या सलामीवीरांनी दिलेल्या धक्क्यामुळे चेन्नईसाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय बनला आहे.
चेन्नईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना साथ
आयपीएल २०२६ च्या हंगामात चेन्नईतील ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांमध्ये फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या मैदानावर झालेले बहुतांश सामने हाय-स्कोअरिंग झाले असून संघांनी अनेक वेळा २०० हून अधिक धावांचे डोंगर उभारले आहेत. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक ठरत असल्याने प्रेक्षकांना धावांचा पाऊस अनुभवायला मिळत आहे. या मैदानावर झालेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. सामना जसा पुढे सरकतो, तशी ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल आणि सोपी होत जाते.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, अकील होसेन, अमन खान, अंशुल कंबोज, डेवाल्ड ब्रेविस, गुर्जापनित सिंग, कार्तिक शर्मा, मॅट हेन्री, मॅथ्यू शॉर्ट, मुकेश चौधरी, नूर अहमद, प्रशांत वीर, राहुल चहर, सर्फराझ खान, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, उर्विल पटेल, झॅक फोल्क्स, आकाश मढवाल, स्पेन्सर जॉन्सन, डायन फोर्स्टर, कुलदीप यादव.
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे, आर. अंब्रिश.
सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून