

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पटलावर रविवारी उर्विल पटेलच्या रुपात नव्या ताऱ्याचा उदय झाला. चेपॉक स्टेडियमवर २७ वर्षीय उर्विलने २३ चेंडूंत ६५ धावांची घणाघाती खेळी साकारली. त्याला जेमी ओव्हर्टनच्या (३६ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सला ५ गडी व ४ चेंडू राखून पराभूत केले. २०१९ नंतर प्रथमच चेन्नईने आयपीएलमध्ये २०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला, हे विशेष.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.
दरम्यान, उभय संघांतील या लढतीत लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. मात्र लखनऊने पॉवरप्लेच्या अखेरीस १ बाद ९० धावांचा टप्पा गाठला होता. जोश इंग्लिसच्या ३३ चेंडूंतील ८५ धावांच्या तुफानी खेळीमुळे लखनऊ एकवेळ २२५ धावांचा पल्ला गाठेल, असे वाटले होते. इंग्लिसने १० चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. परंतु ओव्हर्टनने १०व्या षटकात इंग्लिस व कर्णधार ऋषभ पंतचा (१५) अडसर दूर केला व लखनऊचा डाव घसरला. मिचेल मार्श (१०), निकोलस पूरन (१), एडीन मार्करम (६) यांनी निराशा केली. त्यामुळे लखनऊचा संघ ६ बाद १४७ अशा स्थितीत होता. अखेरीस शाहबाज अहमदने २५ चेंडूंत नाबाद ४३ धावा फटकावल्यामुळे लखनऊने किमान २०० धावांपुढे मजल मारली.
मग चेन्नईला उर्विलच्या खेळीनंतरही अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्यांनी १९.२ षटकांत विजय मिळवून स्पर्धेतील सहावा विजय नोंदवत गुणतालिकेत पाचवे स्थान काबिज केले. लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन (२८) व कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी ४५ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर मैदानात उर्विलचे आगमन झाले. त्याने अवघ्या १३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. आवेश व दिग्वेश राठी यांना सलग तीन षटकार उर्विलने ठोकले.
२ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करून २३ चेंडूंत ६५ धावा फटकावत उर्विल बाद झाला. त्यावेळी चेन्नईला १२ षटकांत फक्त ८४ धावांची गरज होती. मात्र त्यानंतर कार्तिक शर्मा (२०), ऋतुराज (४२) व डेवाल्ड ब्रेविस (१०) यांनी निराशा केल्यामुळे सामना रंगला. अखेरीस ६ चेंडूंत १० धावांची गरज असताना शिवम दुबेने मार्करमला दोन षटकार लगावून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. निर्णायक क्षणी बळी मिळवणाऱ्या ओव्हर्टनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने बाद फेरीच्या शर्यतीतील स्थान कायम राखले आहे. मात्र लखनऊ तळाच्या क्रमांकावर आहे. ११ सामन्यांतील फक्त ३ विजयांमुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
१३ चेंडूंत अर्धशतक आणि चेन्नईचा पराक्रम
उर्विलने १३ चेंडूंत अर्धशतक साकारले. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत आता तो संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने २०२३मध्ये कोलकाताविरुद्ध अशी कामगिरी केली होती. तसेच चेन्नईने २०१९पासून एकदाही १९० धावांहून अधिक लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. मात्र यावेळी उर्विलच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर त्यांनी हा पराक्रम करून दाखवला.