
रणजी ट्रॉफीसह सर्व देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. देशांतर्गत स्पर्धांमधील रणजी करंडक विजेत्याच्या बक्षीस रकमेत दोन पट वाढ करण्यात आली आहे.
महिला क्रिकेटसाठी एकदिवसीय ट्रॉफी आणि टी-२० ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत आठपटीने वाढ करण्यात आली आहे. एकदिवसीय ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्वी सहा लाख रुपये दिले जात असत. मात्र आता बीसीसीआयच्या निर्णयामुळे विजेत्याला ५० लाख रुपये दिले जाणार आहेत. टी-२० साठी विजेत्याला पाच लाखांवरून ४० लाख इतकी रक्कम मिळणार आहे.
या निर्णयाची घोषणा करताना, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सध्याची आणि नवीन फी संरचना शेअर केली आहे. इराणी ट्रॉफीमध्ये २५ लाखांऐवजी विजेत्याला ५० लाख रुपये मिळतील. दुलीप ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला ४० लाखांऐवजी एक कोटी रुपये मिळणार आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बक्षिसाची रक्कम वाढून एक कोटी रुपये झाली आहे. याआधी ही रक्कम ३० लाख रुपये होती. देवधर करंडक स्पर्धेतील विजेत्याची बक्षीस रक्कम २५ लाखांवरून ४० लाख रुपये झाली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला २५ लाखांऐवजी ८० लाख रुपये मिळतील. बीसीसीआयच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा वरिष्ठ महिलांच्या स्पर्धेतील विजेत्या संघांना होणार आहे.
रणजी करंडक विजेत्याला दोन कोटींऐवजी पाच कोटी
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हटले आहे की, "देशांतर्गत क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही आमची पावले उचलत राहू. रणजी करंडक विजेत्याला दोन कोटींऐवजी पाच कोटींची बक्षीस रक्कम मिळेल. त्यामुळे वरिष्ठ महिला संघाला आता वन-डे ट्रॉफी जिंकण्यासाठी सहा लाख रुपयांवरून ५० लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येणार आहे."