सुनील गावस्करांची वचनपूर्ती! जेमिमा रोड्रिग्सला खास गिफ्ट; गाणंही गायलं, पाहा Video

सुनील गावस्करांनी जेमिमाला खास क्रिकेट बॅटच्या आकाराची बनवलेली गिटार भेट दिली. क्रिकेट आणि संगीत या जेमिमाच्या दोन आवडींचा सुंदर संगम या गिटारमध्ये पाहायला मिळाला.
सुनील गावस्करांची वचनपूर्ती! जेमिमा रोड्रिग्सला खास गिफ्ट; गाणंही गायलं, पाहा Video
Published on

भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात जेमिमा रोड्रिग्सच्या नावाचा ठसा आधीच उमटलेला आहे. मात्र, २०२५ महिला विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली तिची नाबाद १२७ धावांची खेळी ही भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम डावांपैकी एक मानली जाते. तिच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर मात करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि भारताने महिला विश्वचषक जिंकत इतिहास रचला. या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी जेमिमाला दिलेल्या प्रॉमिसची आता चर्चा होताना पाहायला मिळतेय.

जेमिमाला संगीताची आवड असल्याने गावस्कर तिला म्हणाले होते, "भारत जर विश्वचषक जिंकला, तर मी तुझ्यासोबत गाणं म्हणेन." भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर गावस्करांनी आपला शब्द पाळत जेमिमासाठी खास सरप्राइज दिले आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) सुरू होण्यापूर्वी दोघांची भेट झाली आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, सुनील गावस्कर जेमिमाला खास क्रिकेट बॅटच्या आकाराची बनवलेली गिटार भेट देतात. गिटार पाहताच जेमिमा खुश होते. त्यानंतर जेमिमा गिटार वाजवत गावस्करांसोबत 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणं गाते. व्हिडिओमध्ये दिसणारा भारतीय क्रिकेटच्या दोन पिढ्यांमधील हा आपुलकीचा क्षण चाहत्यांच्या मनाला भिडला आहे.

नव्या आव्हानासाठी जेमिमा सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा नाबाद १२७ धावांचा डाव केवळ सामना जिंकणारा नव्हता, तर पुढील पिढीतील भारतीय महिला क्रिकेटपटूंना दिशा देणारा ठरला. विश्वचषक जिंकल्यानंतर आता जेमिमा नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये जेमिमाने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली असून, यापूर्वी हे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंगकडे होते. कर्णधार म्हणून जेमिमाची पहिलीच कसोटी विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in