झेल सोडल्यास कसोटी जिंकणे अवघड! माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांचे मत; गोलंदाजांकडूनही कामगिरीत सुधारणा अपेक्षित

कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेणे व दुसरे म्हणजे झेल पकडणे. भारताने पहिल्या कसोटीत याच चुका केल्या. त्यामुळे त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली, असे मत माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी व्यक्त केले.
झेल सोडल्यास कसोटी जिंकणे अवघड! माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांचे मत; गोलंदाजांकडूनही कामगिरीत सुधारणा अपेक्षित
Published on

ऋषिकेश बामणे/मुंबई

कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेणे व दुसरे म्हणजे झेल पकडणे. भारताने पहिल्या कसोटीत याच चुका केल्या. त्यामुळे त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली, असे मत माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी व्यक्त केले.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमासाठी माजी यष्टिरक्षक फलंदाज किरण मोरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतातील पहिल्या कसोटीच्या कामगिरीचे विश्लेषण केले. तसेच संघात २० बळी घेणारे गोलंदाज हवेत, याकडेही लक्ष वेधले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला यजमानांकडून ५ गड्यांनी पराभव पत्करावा लागला.

“कोणताही खेळाडू जाणूनबुजून झेल सोडत नाही. मात्र कसोटीत एक झेल सोडणे महागात पडू शकते. आपण संपूर्ण सामन्यात किमान ५ ते ६ झेल सोडले. यावर तुम्ही काही करू शकत नाहीत. दुसऱ्या सामन्यात संघातील कामगिरीत सुधारणा होईल, असे अपेक्षित आहे. इंग्लंडमधील वातावरणात क्षेत्ररक्षण करताना तुमचे हात थंड झाले किंवा त्यांच्या हालचाली मंदावल्या, तर संघाला फटका बसू शकतो,” असे मोरे म्हणाले.

“आपल्याकडे बुमरासारखा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. तो मालिकेतील किती सामन्यांत खेळेल, हे सांगता येणार नाही. मात्र बुमराच्या साथीने अन्य गोलंदाजांनीही कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. आपल्याला पर्यायांचाही विचार करावा लागेल. २० बळी घेतल्याशिवाय संघाला विजय मिळवणे कठीण आहे,” असेही मोरे यांनी सांगितले.

त्याशिवाय फलंदाजांचे मोरे यांनी कौतुक केले. पंत, यशस्वी, गिल, राहुल यांनी भारतासाठी पहिल्या कसोटीत शतके झळकावली. त्यातही पंतने दोन्ही डावांत शतके साकारली. मोरे यांनी पंतच्या यष्टिरक्षणावरही मत व्यक्त करताना त्याचे कौतुक केले. तसेच उर्वरित मालिकेत भारताने कुलदीप यादव, अर्शदीप सिंग यांनाही संधी देऊन पहावी, असे मत व्यक्त केले. २ जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी सुरू होईल.

कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच योग्य

कसोटी हा क्रिकेटचा मूळ गाभा आहे. त्यामुळे या प्रकाराशी छेडछाड करणे चुकीचे ठरेल. आयसीसीने कसोटीचे दिवस पाचच ठेवावे, असे माझे मत आहे. चार दिवसांचे कसोटी क्रिकेट केल्यास यामधील थरार व रस निघून जाईल, असे मत मोरे यांनी नोंदवले. आयसीसीने २०२७पासून कसोटी क्रिकेटच्या सामन्यांची संख्या ५ वरून ४ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र मुख्य संघातील सामने पाच दिवसांचेच होतील.

logo
marathi.freepressjournal.in