संघात ११ मॅच-विनर असल्यास जेतेपद तुमचेच : किरण मोरे

भारताचे माजी यष्टिरक्षक आणि बियाँड रीच प्रीमियर लीग (बीआरपीएल) निवड समितीचे प्रमुख किरण मोरे यांनी आगामी टेनिस बॉल स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेटपटूंसाठी एक उत्तम संधी असल्याचे मत व्यक्त केले.
संघात ११ मॅच-विनर असल्यास जेतेपद तुमचेच : किरण मोरे
संघात ११ मॅच-विनर असल्यास जेतेपद तुमचेच : किरण मोरे
Published on

नवी दिल्ली : भारताचे माजी यष्टिरक्षक आणि बियाँड रीच प्रीमियर लीग (बीआरपीएल) निवड समितीचे प्रमुख किरण मोरे यांनी आगामी टेनिस बॉल स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेटपटूंसाठी एक उत्तम संधी असल्याचे मत व्यक्त केले.

भारतभरातील इच्छुक खेळाडूंचे स्वागत करताना किरण मोरे म्हणाले की, लीगचे उद्दिष्ट रस्त्यावरील क्रिकेटपटू आणि उदयोन्मुख प्रतिभेसाठी व्यासपीठ प्रदान करणे आहे, ज्यांना अनेकदा व्यावसायिक संरचनांमध्ये प्रवेश मिळत नाही. “भारताच्या प्रत्येक गल्लीबोळातील क्रिकेटपटू, स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज आणि क्रिकेटचे स्वप्न पाहणाऱ्यांना नमस्कार. बियाँड रीच प्रीमियर लीगचे आयुक्त आणि आमच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून भारतातील सर्वात रोमांचक व्यावसायिक टी-१० टेनिस बॉल क्रिकेट लीगमध्ये तुमचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे,” असे मोरे म्हणाले.

“ही फक्त एखादी किरकोळ स्पर्धा नाही, तर हा तुमचा मंच आहे. देशभरातील सहा विभागांमधील प्रतिभेचा शोध याद्वारे घेतला जाईल व त्यांना गौरवण्यात येईल. यासाठी कोणत्याही अकादमीची गरज नाही. तसेच कोणाच्या ओळखीची आवश्यकता नाही. फक्त आपले कौशल्य दाखवण्यासाठी मैदान हवे आहे, अशा खेळाडूंना येथे प्राधान्य दिले जाईल. तुम्हाला कारकीर्दीत मोठी झेप घेण्याच्या उद्देशाने दिशा दाखवली जाईल,” असे मोरे म्हणाले.

या लीगला भारतीय क्रिकेटमधील अनेक प्रमुख नावांचाही पाठिंबा आहे, ज्यात आकाश चोप्रा, रॉबिन उथप्पा आणि मनोज तिवारी यांचा समावेश आहे. “आकाश चोप्रा, रॉबिन उथप्पा आणि मनोज तिवारी यांसारख्या क्रिकेट दिग्गजांच्या पाठिंब्याने, बीआरपीएल स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी येथे आहे. ‘भारत का खेल, भारतीयों का सपना है’,” असे मोरे यांनी नमूद केले.

निवडकर्ते खेळाडूंमध्ये काय पाहतात याबद्दल बोलताना किरण मोरे यांनी भर दिला की खरा सामना जिंकवून देणारा खेळाडू मैदानात अनेक गुण दाखवून देतो. “मॅच-विनर होण्यासाठी तुमच्याकडे निश्चितच चांगले कौशल्य असणे आवश्यक आहे. जर तुम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबींवर लक्ष केंद्रित केले, तर तुम्हाला एक मॅच-विनर मिळेल. जर एखाद्या संघात ११ मॅच-विनर असतील, तर तो संघ विजेता होणारच,” असेही मोरे यांनी सांगितले.

बीआरपीएल १८ ते ४० वयोगटातील इच्छुक आणि अर्ध-व्यावसायिक क्रिकेटपटूंसाठी खुली आहे. यामध्ये भारताच्या २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व खेळाडूंचे स्वागत असेल. त्यामुळे असंख्य युवांसाठी ही लीग दिशादर्शक ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in