
पॅरिस : बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनने ल-गटात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. मात्र त्याचा फक्त एकच विजय ग्राह्य धरला जाणार आहे.
२२ वर्षीय लक्ष्यने दोन दिवसांपूर्वी पहिल्या साखळी सामन्यात ग्वाटेमालाच्या केव्हिन कॉर्डनला सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली होती. मात्र डाव्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे केव्हिनने स्पर्धेतून माघार घेतली. ऑलिम्पिकच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूने साखळीत माघार घेतल्यास त्याचा पराभव तसेच प्रतिस्पर्ध्याचे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे लक्ष्यचे त्या विजयाचे गुण रद्द करत सोमवारी झालेला सामना या स्पर्धेतील पहिला सामना म्हणून धरण्यात आला. त्याशिवाय केव्हिनच्या माघारीमुळे साहजिकच त्याची सोमवारी इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित जोनाथन ख्रिस्तीविरुद्ध होणारी लढतही रद्द झाली.
दरम्यान, लक्ष्यने सोमवारी बेल्जियमच्या जुलियन कॅरागीला २१-१९, २१-१४ असे नेस्तनाबूत केले. आता त्याच्यासमोर बुधवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ख्रिस्तीचे आव्हान असेल. या दोघांमधील विजेता ल-गटातून अग्रस्थान मिळवेल आणि बाद फेरीत (राऊंड ऑफ १६) प्रवेश करेल. दुसरीकडे भारताचा अन्य स्पर्धक एच. एस. प्रणॉय बुधवारी क-गटात दुसरा साखळी सामना खेळणार आहे.
लक्ष्य क्रमवारीत १८व्या स्थानी आहे. दुसऱ्या लढतीत तो एकवेळ पहिल्या गेममध्ये ८-११ असा पिछाडीवर होता. मात्र तेथून त्याने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये मग त्याने सहज वर्चस्व गाजवले. प्रकाश पदुकोण आणि विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्यने सराव करतो. तसेच पहिल्या लढतीचे गुण रद्द झाल्याने त्याने कोणतीही नाराजी व्यक्त न करता पुढील सामन्यावर आपले लक्ष असल्याचे सांगितले.